महिलांनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे आणि आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही असे सांगत देशपातळीपासून ते गावापर्यंत अनेक पदांवर त्या सेवा करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. कर्नाटक सरकार महिलांसाठी सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करत आहे अशी प्रतिक्रिया कागवाडचे आमदार राजू कागे यांनी व्यक्त केली.
कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका विभाग, कर्नाटक राज्य ग्रामीण उपजीविका विकास संस्थेच्या वतीने कागवाड तालुक्यातील जुगूळ गावातील मल्लिकार्जुन सभा भवनात बुधवारी आयोजित कार्यक्रमात आमदार राजू कागे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या समारंभात बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला संघटनेच्या सदस्यांनी तयार केलेले एप्रन गणवेश प्रधानमंत्री औषधी शक्ती निर्माण योजनेच्या शाळांमधील किचन मदतनीसांना वाटप करण्यात आले.
जुगूळ ग्रामपंचायतीच्या संजीवनी ग्रामपंचायत स्तरावरील 22 महिला स्वयंसहायता संस्तेच्या योजनेंतर्गत 22 लाखांचा सामुदायिक भांडवल निधीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. बसव गृहनिर्माण योजनेंतर्गत 90 लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी आमदारांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या साधना पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरण्णा वाली, मध्यान्ह भोजन योजना तालुका संचालक मल्लिकार्जुन नामदर, ग्रामपंचायत उपाध्यक्षा नीता कांबळे, संजीवनी महिला संघाच्या अध्यक्षा जयश्री मिनाचे, स्थानिक पीकेपीएस अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सुभाष पाटील, चेतना पाटील, ग्रामपंचायत विकास अधिकारी शैलश्री भजंत्री, एनएनआरएलएम अधिकारी आनंद वंटगुडे, प्रकाश नंदेश्वर, ए.एन. मिनाचे, जी.के.पाटील आदी उपस्थित होते.
Recent Comments