Chikkodi

सीपीआय तळवार यांच्यावर कारवाई करा; वकिलांचा कामकाजावर बहिष्कार

Share

 

चिक्कोडी लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे वकील मोहन मोटन्नावर हे मतदान केंद्रावर जात असताना सीपीआय तळवार यांनी त्यांचे कपडे पकडून, ओढून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज चिक्कोडी येथील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला.

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वकील मोहन मोटन्नावर यांचा अवमान करणाऱ्या सीपीआय बी. एस. तळवार यांचा निषेध व्यक्त करत बसवा सर्कलपासून मोर्चा काढून निषेध केला.

मतदान केंद्रावर जात असताना निवडणूक आयोगाने दिलेला परवाना दाखवून देखील त्यांच्याशी उद्धटपणे वर्तन करण्यात आले. दाखविण्यात येत असलेला परवाना नकली असल्याचे सांगत वकिलांचा गणवेश ओढण्यात आला. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सीपीआय बी. एस. तळवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वकिलांनी केली. हा प्रकार राष्ट्रीयीकृत पक्षाच्या उमेदवारासोबत घडला असता, तर त्यांच्यावर पोलिस खात्याच्या वरिष्ठांनी कडक कारवाई केली असती. मोहन मोटन्नावर हे पेशाने वकील असून त्यांच्यासोबत झालेल्या प्रकारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

या आंदोलनात वकील संघाचे अध्यक्ष कलमेश किवड, उपाध्यक्ष एन.डी. दरबारे, सचिव एस.आर. वाली, बी.एन.पाटील, एस.एल.यरनाळे, डी.आर.कोटेप्पागोळ, व्ही.जी.मडप्पगोळ, एम.बी.बने, एच.एस. नसलापुरे आदी सहभागी झाले होते.

Tags: