actors

खुनाच्या आरोपाखाली अभिनेता दर्शनला अटक

Share

 

चित्रदुर्ग येथील मेडिकल शॉपमधील सहाय्यक रेणुकास्वामी यांच्या हत्येप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी मंगळवारी अभिनेता दर्शन थुगुदिपा आणि नऊ साथीदारांना ताब्यात घेतले.

अलीकडेच रेणुकास्वामी यांचे अपहरण करून त्यांची हत्या करून कामाक्षिपल्य येथील नाल्यात त्यांचा मृतदेह फेकण्यात आल्याचे आढळून आले होते. मृतदेहावर शारिरीक जखमा आढळून आल्याने ही हत्या असल्याची पुष्टी झाली. रेणुकास्वामी १ जून रोजी घरातून निघाले होते मात्र ते घरी परतलेच नसल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह ९ जून रोजी कामाक्षीपल्य येथील नाल्यात आढळून आल्यानंतर याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.

अभिनेता दर्शनच्या सूचनेनुसार रेणुकास्वामी यांना चित्रदुर्ग येथून बोलावण्यात आले आणि त्यांना बेंगळुरूच्या कामाक्षिपल्य येथील एका शेडमध्ये ठेवण्यात आले. 8 जून रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती आणि 9 जून रोजी त्यांचा मृतदेह सापडला होता. रेणुकास्वामी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचा मृतदेह सुमनहळ्ळीजवळील अनुग्रह अपार्टमेंटजवळील नाल्यात फेकून देण्यात आला. 9 जून रोजी सकाळी परिसरातील कुत्री मृतदेह ओढत नेट असल्याचे निदर्शनात येताच अपार्टमेंटचे सुरक्षा रक्षक राम दोरजी यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त बी दयानंद यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हणाले, सीसीटीव्ही व इतर तांत्रिक माध्यमांच्या आधारे त्या व्यक्तीची ओळख पटली आणि सदर व्यक्ती चित्रदुर्ग येथील रेणुका स्वामी असल्याचे निष्पन्न झाले. कन्नड चित्रपट अभिनेता आणि त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात रेणुका स्वामी यांची हत्या दर्शन यांनी केल्याचे समोर आले आहे. यामागे आर्थिक व्यवहार तसेच अभिनेत्री पवित्रा गौडा यांना अश्लील मेसेज केल्यामुळे खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 10 हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त बी दयानंद यांनी दिली.

Tags: