लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते अनेक दावे-प्रतिदावे करत आहेत. निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
आपण मतदानाचा विश्वविक्रम केला आहे. महिला मतदारांची संख्या महत्त्वाची होती. येत्या काळात तरुण या मतदानातून प्रेरणा घेतील. ६४ कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले. ३१ कोटींहून अधिक महिला मतदारांनी मतदान केले. मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत बळकट आहे. निवडणूक उत्साहात पार पडली आहे. आता आम्ही पारदर्शीपणे मतमोजणीला आणि निकालाच्या दिवसाला सामोरे जात आहोत. कुणाकडून काहीही चुकीचे करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही कुणाचीही गय करणार नाही. लोकशाहीची मूळे बळकट करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो, असे राजीव कुमार यांनी म्हटले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पुढे म्हणाले, “आम्ही भारतीय मतदारांना स्टँडिंग ओव्हेशन देतो. आम्ही ज्येष्ठांच्या घरी जाऊन त्यांची मते घेतली आहेत. ८५ वर्षांवरील मतदारांनी घरबसल्या मतदान केले. 1.5 कोटी मतदार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी 135 विशेष गाड्या, 4 लाख वाहने आणि 1692 फ्लॅटचा वापर करण्यात आला. 68763 निगराणी पथके निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत होत्या. भारतीय निवडणुकीतील यशाचे तपशीलवार वर्णन करतान राजीव कुमार यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले की, “मोठ्या ब्रँडपासून स्टार्टअपपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने योगदान दिले.”
दरम्यान, इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या ‘लापता जेंटलमैन वापस आ गए’ मीम्सवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणुका झाल्याचेही आयोगाने मान्य केले. पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपविण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.


Recent Comments