Belagavi

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

Share

१९८६ साली कन्नड सक्ती आंदोलनात अनेक सीमावासियांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळेच 67 वर्षांनंतरही सीमाप्रश्नाची धग कायम आहे. या हुतात्म्यांना सदैव स्मरणात ठेवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी २ मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ न देता पुढील पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची माहिती मिळावी यासाठी अभिवादन कार्यक्रम केला जातो. हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा सीमालढ्याला बळकटी देण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला.

यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर बोलताना म्हणाले, सीमाभागात गेल्या ६७ वर्षांपासून सीमावासीयांवर अन्याय होतोच आहे. अलीकडे अन्यायाची तीव्रता वाढलेली आहे. परंतु महाराष्ट्रातील एकही नेता याविषयी बोलत नाही, हे आपले दुर्दैव आहे. यासाठीच आपल्यामध्ये एकी अभेद्य असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आपल्या पक्षव्यतिरिक्त आमच्या व्यथा दिसत नाहीत. आपल्याविषयी त्यांना सहानुभूती नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

माजी आमदार मनोहर किणेकर बोलताना म्हणाले, १९५६ साली निर्माण झालेल्या सीमाप्रश्नाला आजवर न्याय मिळाला नाही. भाषावार प्रांतरचनेत अन्यायाने डाम्बण्यात आलेल्या सीमाभागाचा, सीमाप्रश्नी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचा महाराष्ट्राला विसर पडला आहे. महाराष्ट्राच्या निराशाजनक वर्तणुकीमुळे सीमाभागातील संघटन निष्किय होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समितीच्या माध्यमातून व्यापक बैठका घेण्यात याव्यात आणि नव्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या संधी देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी खानापूरचे निरंजन सरदेसाई, राजाभाऊ पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर यांचीही भाषणे झाली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुसकर, महादेव पाटील, ऍड. राजाभाऊ पाटील, मालोजी अष्टेकर, आर एम. चौगुले, ऍड. अमर येळ्ळूरकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, प्रकाश मरगाळे, मदन बामणे, नेताजी मनगुतकर, माजी आमदार मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, गोपाळ देसाई, अंकुश केसरकर आदींसह मोठ्या संख्येने समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: