अनगोळ येथील काळा तलावाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही हा तलाव समस्यांच्या गर्तेत सापडला आहे.
आपण पाहात असलेली दृश्ये हि नयनरम्य वाटणाऱ्या परिसराची नसून अनगोळ येथील काळा तलावाची आहेत. अनगोळ येथील काळा तलावाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही हा तलाव समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. तलावाच्या विकासासाठी कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या अंतर्गत हे काम सुरू करण्यात आले. मात्र, स्वच्छ करण्यात आलेला तलाव पुन्हा केंदाळाने व्यापला आहे. त्यामुळे तलावाच्या सुशोभिकरणासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कणबर्गी येथील तलावाच्या विकासकामाला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, अनगोळ येथील काळा तलावाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. यामुळे तलावाचे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे. या तलावामध्ये सांडपाणी सोडण्यात आल्यामुळे दुर्गंधी व कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संपूर्ण तलावातील पाणी दूषित बनले आहे. अशातच विषारी वेली आणि केंदाळ पुन्हा वाढले आहे. तलावातील केंदाळ काढून स्वच्छ करण्यात आले होते. पण या तलावामध्ये गटारीचे सांडपाणी सोडण्यात आल्याने तलाव पुन्हा दुर्गंधीयुक्त बनला आहे. तलावातील सांडपाण्यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. वाढलेल्या वेलींमुळे साप-किडय़ांची समस्या भेडसावत आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे शेतकरी आणि परिसरातील रहिवाशांमध्ये सापांची भीती निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. विषारी वेली आणि केंदाळामुळे तलावातील पाणी दूषित बनले आहे.
यासंदर्भात दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार अभय पाटील बोलताना म्हणाले, अनगोळ मधील काळा तलाव विकासासाठी योजना आखण्यात आली असून मागील महिन्यात विकासकामाला प्रारंभ झाला आहे. बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी दोन वेळा तसेच शहरातील लेंडी, नागझरी आणि जक्केरी या तीन महत्वाच्या नाल्यांच्या विकासासाठी यापूर्वीच प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यकाळात या प्रस्तावाला मान्यता मिळाली होती. तसेच विकासासाठी १०७ कोटी रुपयांचा निधीदेखील जाहीर करण्यात आला होता. मात्र काँग्रेस सरकारच्या काळात हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचा आरोप आम. अभय पाटील यांनी केला आहे.
शहरातील अन्य तलावांचा विकास तातडीने होत आहे. पण या तलावाचे काम रखडत असल्याने या मागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या तलावाचा विकास करण्यास मनपाचे अभियंते उदासीन असल्यामुळे तलावाचे काम रखडल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे या तलावाचा विकास विनाविलंब करण्यात यावा. या ठिकाणी सोडण्यात आलेले गटारीचे पाणी बंद करण्यात यावे व तलाव स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Recent Comments