शतकापूर्वी लोकांकडे संस्कृती होती पण शिक्षण नव्हते. सध्या तरुणांकडे शिक्षण आहे पण ते संस्कृतीपासून वंचित आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजात वडील, आई, गुरू, ज्येष्ठांप्रती असलेला आदर कमी होत असून तरुण वर्ग भरकटत चालला आहे, व्यसनाधीन होत आहे, ही वेदनादायी बाब असल्याचे मत नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लम प्रभू महास्वामीजी यांनी मांडले.
जागतिक लिंगायत महासभा आणि नागनूर रुद्राक्षी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभुदेव सभागृहात आयोजित 3 दिवसीय बसव जयंती कार्यक्रमाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.

स्वामीजी पुढे म्हणाले की, लिंगायत मठ आणि समाजातील ज्येष्ठांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या नसत्या तर आज कर्नाटक हे दुसरे बिहार झाले असते. कर्नाटकाला आज भारतात विशेष दर्जा मिळत असेल तर तो आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे मिळत आहे असे स्वामीजी म्हणाले. बसव जयंती उत्सवात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल डॉ. अल्लमप्रभू महास्वामींनी आनंद व्यक्त केला.
जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ. एस. एम. जमादार म्हणाले की, संत बसवेश्वरांनी बाराव्या शतकात क्रांती केली. परंतु बसवेश्वरांच्या अनुयायांनी या क्रांतीचा प्रसार केला नाही. बसवण्णांच्या अनुयायांमध्ये आज शेकडो जाती पोटजाती आहेत, ज्यांनी जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले, मात्र आज बसवेश्वरांच्या अनुयायांमध्ये असलेल्या पोटजाती हि बाब खेदजनक आहे. बसवेश्वरांनी केलेल्या क्रांतीचा प्रसार झाला असता तर आज धर्मनिरपेक्ष समाज निर्माण झाला असता, असे ते म्हणाले.

तोंटद विरक्त मठाचे शिवमूर्ती स्वामी यांनी बेळगावमध्ये संत बसवेश्वरांच्या तत्वांना अनुसरून बदल होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच घरगुती समारंभात येणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तू देण्याऐवजी धर्मग्रंथावर आधारित पुस्तक भेटस्वरूपात दिल्या संस्कृती आणि भाषेचा विकास होईल, असे मत मांडले.
बेळ्ळारी येथील बसवानंद स्वामी यांनी आपल्या मनोगतात संत बसवेश्वरांच्या समानतेच्या तत्वांविषयी विचार व्यक्त केले. जागतिक लिंगायत महासभेचे खजिनदार मुरीगेप्पा बाली यांनी स्वागत केले. मंजुनाथ शरणप्पनवर यांनी सूत्रसंचलन केले तर जिल्हाध्यक्ष बसवराज रोटी यांनी आभार मानले.


Recent Comments