Belagavi

हिंदवाडी येथे बसव जयंती साजरी

Share

हिंदवाडी येथील शरण ज्योती सत्संग समुहाच्या वतीने बसव जयंतीनिमित्त रानडे मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

असमानतेच्या विरोधात समाजाच्या क्रांतिकारी बदलामध्ये संत बसवेश्वरांचे योगदान मोठे आहे. त्यांनी समाजातील जातिव्यवस्था नष्ट करून सामाजिक न्यायासाठी लढा दिला आणि संपूर्ण मानवजातीसाठी संत बसवेश्वर ज्ञानज्योती ठरले असून त्यांच्या तत्वांचे अनुसरण प्रत्येकाने आपल्या जीवनात करावे, असे आवाहन शरण मातोश्री वाग्देवी यांनी केले.

लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इरण्णा देयन्नवर म्हणाले की, आजच्या काळात प्रत्येकाने बसवण्णांची तत्त्वे आपल्या जीवनात अंगीकारून सुंदर समाजासाठी कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे.

रानडे मंदिर, अकादमी ऑफ कॉम्पॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनचे सचिव मारुती जिरली यांनी, बाराव्या शतकात संत बसवेश्वरांच्या तत्वांविषयी मार्गदर्शन केले. जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या संत बसवेश्वरांनी क्रांतीची बीजे पेरली. ‘कायकवे कैलास’, ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशा अनेक तत्त्वांचा उपदेश करणाऱ्या महान संतांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

यावेळी सतीश पाटील, श्रीकांत सुतगट्टी, रत्नश्री गुडेर यांनी स्वागत तर मंगल मठद यांनी प्रास्ताविक केले. ममता अंटीन आणि शोभा काडन्नवर यांनी ईशस्तवन गायिले. भारती रत्नप्पगोळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गीता एम्मी यांनी सूत्रसंचलन तर सुलोचना वस्त्रद यांनी आभार मानले.

Tags: