हुबळी येथील अंजली हत्या प्रकरण संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारे असून हुबळीत झालेल्या हत्याकांडानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे दिसून येत आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया चिक्कोडी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश आप्पाजीगोळ यांनी व्यक्त केली.

चिक्कोडी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, नेहा हिरेमठ खून प्रकरण ताजे असतानाच अंजली आंबिगेर या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रज्वल रेवण्णा तपासात पोलीस विभाग गुंतला आहे. राज्यातील काँग्रेस सरकार कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून, गृहमंत्री जी परमेश्वर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच चिकोडी जिल्हा भाजप महिलाध्यक्षा शाम्भवी अश्वपूर यांनीही निषेध नोंदविला. हुबळीत लागोपाठ झालेल्या खून प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या १०.३० वाजता चिकोडी येथे जिल्हास्तरीय निषेध आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस अप्पासाहेब चौगुला आणि भाजपचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments