Belagavi

जिजामाता चौकातील समस्या मृत्यूचा सापळा

Share

बेळगाव स्मार्ट सिटीचे वाभाडे मान्सूनपूर्व पावसातच निघाले असून बेळगाव शहरात येणाऱ्या जिजामाता चौकात याचे प्रत्यंतर येत आहे. या भागात असणाऱ्या नाल्यातील सांडपाणी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे या भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बेळगाव शहराचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला खरा. मात्र सुरुवातीच्या टप्प्यापासूनच स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामकाजाचे वाभाडे काढण्यात येत आहेत. प्रत्येक कामकाजात आढळून येणाऱ्या त्रुटी आणि यामुळे बेळगावकर शहरवासीयांचे होणारे हाल यामुळे वैतागलेल्या जनतेकडून स्मार्ट सिटी च्या कामकाजावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातीलजुन्या पी बी रोडवरील जिजामाता चौकची अस्वथाही याच स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळे अवघड बनली आहे. एरव्ही पावसाळ्यात या चौकाची दुरवस्था तर दिसून येतेच परंतु मान्सूनपूर्व बरसलेल्या पावसातच या चौकाची समस्याच चव्हाट्यावर आली आहे.

मनपा प्रशासन, स्मार्ट सिटी अधिकारी आणि कॅंटोन्मेंट बोर्ड या सर्वांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या चौकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागात असणाऱ्या कचरायुक्त नाल्यामुळे तसेच गटारींमुळे येथील जनतेचे जगणे असह्य झाले आहे. नाला आणि गटारींची स्वच्छता करण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण होऊन बसले आहे.

या चौकात असलेल्या रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षाचालक आणि या भागातील नागरिकांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधींना समस्या सोडविण्यासाठी निवेदन सादर केले आहे. विद्यमान आमदार असिफ सेठ यांनीदेखील तातडीने या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाने मनपाला येथील गटारी स्वच्छ करण्याची सूचना दिली आहे. मात्र पालिका कर्मचारी गटारीत कचरा काढून रस्त्यावर ढीग घालत आहेत यामुळे या समस्येत आणखीन भर पडत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रत्येक वर्षी या समस्येबाबत प्रसारमाध्यमातून आवाज उठविला जातो या भागातील नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने सादर केली आहेत. मात्र या चौकाची परिस्थिती मात्र जैसे थे अशीच आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली करण्यात आलेले कामकाज हे जनतेसाठी डोकेदुखी ठरत असून वाहनचालक, पादचारी यांच्यासोबत येथील व्यावसायिकांना या समस्येमुळे मोठा फटका सहन करावा लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढून समस्येचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

Tags: