Kagawad

शेडबाळमध्ये संत बसवेश्वर जयंती उत्साहात

Share

कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथे संत बसवेश्वर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वीरशैव लिंगायत समाज आणि माळी बांधवांच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संत बसवेश्वर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवारी सकाळी शेडबाळ येथील माळी समाज भवनात बसवेश्वरांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून, पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. या पार्श्वभूमीवर निघालेल्या मिरवणुकीत सुमारे २५० कलश घेऊन महिलांनी सहभाग नोंदविला. १२ व्या शतकात निर्मिती केलेल्या पुरातन श्री बसवेश्वर मंदिरात विधिवत पूजन पार पाडून बसवेश्वर जयंती आचरणात आणण्यात आली.

बसवण्णा मंदिरातील चांदीच्या बसवेश्वरांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी आणलेल्या कलशातील पाण्याने बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यावेळी पारंपरिक भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.

विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील सारवाड गावातील श्री ईश्वर गारुडी गोम्बे आणि सहकाऱ्यांच्या वतीने गोम्बे कुणीत हा पारंपरिक लोकनृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी ५१ बैलजोड्या असलेल्या रथातून बसवेश्वर मूर्तीची शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती अक्कमहादेवी कोरे यांनी संत बसवेश्वरांच्या तत्वांवर आधारित मार्गदर्शन केले. जगातील प्रत्येकाने एक होऊन जगावे, इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे असे सांगितले.

Tags: