Bailahongala

बँक कर्मचाऱ्यांच्या छळापोटी महिलेचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Share

आयडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कर्जाच्या परतफेडीच्या कारणावरून छळ होत असल्याचा आरोप करत बैलहोंगल तालुक्यातील बैरनट्टी गावातील एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

बैरनट्टी गावातील एका महिलेच्या तरुणाने गाय खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हा तरुण महिन्याला हप्ते भरून दोन लाख रुपयांचे कर्ज फेडत होता. तो जमखंडी येथील हॉटेलमध्ये काम करून कर्ज फेडायचा. मात्र या महिन्यात 15 दिवस उशिरा आल्याने बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना त्रास दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आयडीएफसी बँकेचे कर्मचारी सोमू किरगाव आणि अन्य एका कर्मचाऱ्यांनी या मायलेकाचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित तरुणाची आई आजारी होती. यावेळी तिच्या घरी येऊन बँक कर्मचाऱ्यांनी हप्त्यासाठी तगादा लावला. त्यावर माझा मुलगा येऊन तुमचे पैसे देईल असे तिने सांगितले. तरीही बँक कर्मचाऱ्यांनी तरुणाला फोन करून शिवीगाळ केली. त्यानंतर एके दिवशी गावात आलेल्या बँक कर्मचाऱ्यांनी घर सोडून बाहेर ये, आम्ही घराला कुलूप लावू, अशी धमकी दिली. त्यावेळी अब्रुच्या भीतीने महिलेने विष प्राशन करेन, असे सांगितले. त्यावर उर्मट कर्मचाऱ्यांनी तुम्ही विष प्या, किमान त्यामुळे तरी तुमचा मुलगा येईल, असे सांगितले. त्यामुळे अधिकच व्यथित झालेल्या महिलेने विष प्राशन केले.

तेथील स्थानिकांनी त्यांना तातडीने बैलहोंगल तालुका रुग्णालयात दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत असून ती पूर्णपणे बरी होईल अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली.  बँक कर्मचारी कर्ज फेडण्यासाठी रोज त्रास देत असून त्यामुळे जगणे कठीण होत असल्याचा आरोप करत महिलेने नेसरगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Tags: