Belagavi

स्वतःही टाकीचे घाव सोसत जगण्याची लढाई लढतोय पाथरवट समाज

Share

दगडावर टाकीचे घाव घालत खलबत्ता, उखळ, जातं अशा विविध प्रकारच्या वस्तू तयार करणारा पाथरवट समाज स्वतःही टाकीचे घाव सोसत जगण्याची लढाई लढतोय. पाहुयात त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट.

होय, ‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही’ अशी एक म्हण आहे. तशाचप्रकारे दगडावर टाकीचे घाव घालून एकाहून एक सुंदर दैनंदिन वापराच्या वस्तू बनवून परंपरा जोपासण्याचा प्रयत्न पाथरवट समाज करतोय. आजच्या आधुनिक युगात मिक्सर, ग्राइंडर, फ्लोअर मिल अशा विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या आक्रमणातही आपला पारंपरिक व्यवसाय करत, परंपरा जोपासण्याचा विडा उचललेल्या या समाजाने जिद्दीने जगण्याची लढाई सुरु ठेवली आहे.

बेळगावातील महांतेशनगर भागात होलसेल फ्रुट मार्केटजवळ पाथरवट समाजाची काही कुटुंबे दगडापासून सुंदर, आकर्षक जाती, खलबत्ते, उखळ, डोना म्हणून ओळखले जाणारे कपडे धुण्यासाठी पाणी साठवण्याचे छोटे हौद, दगडी पोळपाट आदी साहित्य घडवून त्याची विक्री करून पोटाची खळगी भरत आहेत. मिक्सर, ग्राइंडर, फ्लोअर मिल अशा विजेवर चालणाऱ्या आधुनिक उपकरणांच्या आक्रमणातही आपला पारंपरिक व्यवसाय ते करत आहेत. दगड महाग आणि मंदिरांसाठी वापराने दुर्मिळ झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र तरीही दगडासारखाच कणखरपणा अंगी बाणवत जिद्दीने ते पाथरवट व्यवसाय करत आहेत.

यासंदर्भात माहिती देताना विकास पात्रोट या पाथरवट युवकाने इन न्यूजशी बोलताना, दगड मिळणे दुर्मिळ झाल्याने, वाहनांचे भाडे वाढल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. काळ्या आणि पांढऱ्या दगडांपासून आम्ही या वस्तू चिकोडीजवळील आमच्या गावाकडे तयार करतो. निपाणी येथे दगडांवर टाकीचे घाव घालून वस्तू तयार केल्या जातात. पण त्या आणण्यासाठीच वाहनांचे भाडे वाढल्याने आमचा पारंपरिक व्यवसाय संकटात आहे. मिक्सरमुळे खलबत्त्याची मागणी कमी झाली आहे. पण वास्तुशांती आणि लग्न सोहळ्याला उखळ, जातं या वस्तू लागतातच. त्यामुळे धार्मिक परंपरा पाळणाऱ्या लोकांकडून त्याला बऱ्यापैकी मागणी आहे. त्यामुळे कसाबसा चरितार्थ चालतो असे विकासने सांगितले.

दरम्यान, ग्राहक रवीकुमार यांनी सांगितले की, पूजा व धार्मिक कार्यक्रमांसाठी उखळ, जातं अशा वस्तू लागतातच. त्यामुळे आम्ही त्या येथून खरेदी करतो. या वस्तूंच्या वापराने शारीरिक तंदुरुस्ती राहण्यास मदत तर होतेच शिवाय मसाले, भरड व धान्याची मूळ चव चाखता येते. मिक्सरसारख्या इलेक्ट्रिक वस्तूंच्या वापराने पदार्थांची मूळ चव नाहीशी होते. त्यामुळे दगडापासून बनवलेल्या पारंपरिक वस्तूंचा वापर करणेच योग्य आहे, असे त्यांनी सांगितले.

एकंदर, दगडावर टाकीचे घाव घालून दैनंदिन वापराच्या सुंदर दगडी वस्तू बनवणारा पाथरवट समाज विविध अडचणींमुळे स्वतःही टाकीचे घाव सोसतो आहे. पण सचोटीने, प्रामाणिकपणाने कष्टाचे काम करून ताठ मानेनं जगतोय. परंपरा जपणाऱ्या अशा समाजाला त्यांनी बनवलेले साहित्य खरेदी करून आपणही त्यांचे जीवन सुसह्य करू शकतो हेच खरे.

Tags: