विवाहित पत्नीने धोका दिल्याच्या रागातून वाग्दत्त पतीने युवतीसह तिच्या पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना अथणी तालुक्यातील कोकटनूर गावात घडली.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कोकटनूर गावात मंगळवारी एकाने दाम्पत्याची चाकूने वार करून हत्या केली. त्यांच्या बचावासाठी आलेल्या अन्य दोघांवरही हल्ला करण्यात आला.
यासीन बागोडे (21) आणि हीनाकौसर (19) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. आरोपी तौफिक काडी (24) हा त्याच गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यासीन आणि हीनाकौसर यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, चार महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी हीनाकौसरचा विवाह तौफिकसोबत ठरवला होता. लग्न निश्चित झाल्यानंतर प्रेमीयुगुलाने घर सोडले. दीड महिन्यापूर्वी पालकांनी प्रेमीयुगुलाला गावात आणून गावातील वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत लग्न लावून दिले. हे नवविवाहित दाम्पत्य दीड महिन्यापासून कोकटनूर येथे राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घडामोडींमुळे तौफिक संतापला होता. मंगळवारी त्याने यासीनच्या घरात घुसून दाम्पत्यावर चाकूने वार केले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या बचावासाठी आलेले पालक अमिनाबाई आणि मुस्तफा मुल्ला यांच्यावरही हल्ला करण्यात आला. दोन्ही जखमींना मिरज रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेतील आरोप तौफिक फरार असून त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत, असे एसपी भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.


Recent Comments