खरेदीच्या बहाण्याने दुकानात येऊन किराणा दुकानदार महिलेला संमोहित करून युवकाने तिचे मंगळसूत्र हातोहात लांबवले. चिक्कोडी तालुक्यातील रुपीनाळ गावात शिनावरी घडलेली ही घटना उशिरा उघडकीस आली आहे.

गुटखा खरेदीच्या बहाण्याने हा तरुण किराणा दुकानात आला होता. दरम्यान, त्याने दुकानदार सुवर्णा पवार यांच्याकडे नारळ, उदबत्ती मागितली. त्यानंतर त्याने एक पुडी त्यांना दाखवली. पुडी पाहताच सुवर्णा पवार यांना चक्कर आल्यासारखे वाटले. युवकाने पवार यांना त्या पुडीत त्यांचे मंगळसूत्र ठेवण्यास सांगितले. सुवर्णा पवार यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर कागदाच्या पुडीत मंगळसूत्र ठेवून पुडी बांधून ती ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितले.
यावेळी त्याने मंगळसूत्राची पुडी देण्याऐवजी वाळू भरलेली पुडी दिली अन 15 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र घेऊन तेथून फरार झाला. अर्ध्या तासानंतर अगदी डोळ्यादेखत हातचलाखी करून मंगळसूत्र लांबवल्याने सुवर्णा पवार यांच्या पायाखालची वाळू घसरली. नंतर त्यांनी आपल्या पतीला याची माहिती दिली. हा सर्व घटनाक्रम दुकानात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यानंतर युवकाची हातचलाखी उघडकीस आली आहे. अंकली पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.


Recent Comments