बेळगाव अधिवेशनात राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जे सरकारने पूर्णपणे माफ करावीत, अशी मागणी शेतकरी नेते कुरुबुर शांतकुमार यांनी केली.
बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना शेतकरी नेते कुरुबुर शांतकुमार म्हणाले की, बेळगाव अधिवेशनात आतापर्यंत झालेल्या सर्वसमावेशक चर्चेने शेतकऱ्यांचे प्रश्न कितपत मार्गी निघाले हे पाहण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी. याच अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी केली. 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. त्यादिवशी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आम्ही आवाज उठवू, असे ते म्हणाले.
शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात कृषी उत्पादन पणन कायद्याचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी मी राज्यातील सहा जिल्ह्यांचा दौरा केला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे दु:ख आपण पाहू शकत नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. शासनाकडून पुरेशी भरपाई मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील 224 तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ असतानाही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. आता बेळगाव अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करेल अशी टीका त्यांनी केली.
राज्यात उसाचा भाव निश्चित करण्यासाठी अनेक आंदोलने करूनही सरकार आतापर्यंत भाव ठरवण्यात टाळाटाळ करत आहे. या अधिवेशनात राजकारण्यांनी शेतकऱ्यांना मूर्ख बनवू नये. अधिवेशनात ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विजेचे खाजगीकरण करण्याचे पाऊल निषेधार्ह आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली दिल्या जात नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांशी विवाह करणाऱ्या मुलींना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments