Belagavi

बेळगावात लवकरच नवे सुसज्ज एएसआय हॉस्पिटल : कामगार मंत्री संतोष लाड

Share

बेळगावातील ईएसआय हॉस्पिटल पाडून लवकरच नवीन सुसज्ज हॉस्पिटल बांधण्यात येईल अशी माहिती कामगार मंत्री संतोष लाड यांनी दिली. भाजपने आधी आपल्या भ्रष्टाचारावर बोलावे मग इतरांना शहाणपण शिकवावे अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

बेळगावात बुधवारी कामगार खात्याच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री संतोष लाड म्हणाले की, बेळगावातील ईएसआय हॉस्पिटल अत्याधुनिक स्वरूपात परिवर्तित करण्याची गरज आहे. या दृष्टीने कामगार खात्याकडून पावले उचलण्यात येत आहेत. लवकरच सुसज्ज हॉस्पिटल आकारास येईल असे त्यांनी सांगितले. कर्नाटकात झोमॅटो, स्विग्गी, अमेझॉन, फ्लिपकार्ट

सारख्या ऑनलाईन सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यात 3 ते 4 लाख कर्मचारी आहेत. त्यांना कामगार खात्यामार्फत सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्री लाड यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारवाडमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी विरुद्ध संतोष लाड असे वादळ उठली का? या पत्रकारांच्या प्रश्नावर, साधा वाराही नाही अन वादळ कुठले? अशी मिश्किल टिपणी मंत्री लाड यांनी केली.

भाजपने आधी आपल्या भ्रष्टाचारावर बोलावे मग इतरांना शहाणपण शिकवावे अशी कोपरखळीही मंत्री लाड यांनी मारली. ते म्हणाले, रातोरात पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर तीन लाख कोटी रुपये ब्लॅक मनी व्हाईट करण्यात आला. यात कोणाचा हात आहे हे सगळे जाणतात. द्वारका कॉरिडॉरमध्ये 18 किमीच्या रस्त्यासाठी 250 कोटी इतका अवाढव्य खर्च दाखवण्यात आल्याचा ठपका केंद्र सरकारच्याच अखत्यारीतील कॅगने ठेवलाय.

मध्य प्रदेशात प्रधानमंत्री स्वास्थ्य योजनेत भाजप खासदाराच्या एकाच मोबाईल नंबरवरून नोंदणी करून तब्बल 7 लाख मृतांना लाभार्थी दाखवून मृताच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याचा प्रकार घडलाय. असे अनेक भ्रष्टाचार भाजपने केलेत. गेल्या दहा वर्षांत केवळ मोदींना, भाजपला आणि बड्या उद्योगपतींना सगळे अनुकूल झाले आहे. देशातील गरीब शेतकरी, लघु-मध्यम उद्योग किंवा बेरोजगार युवकांना काहीच फायदा झाला नसल्याचा ठपका मंत्री लाड यांनी ठेवला.

शिक्षणावर 18% जीएसटी लावून शिक्षण महाग करून गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मुलांनी शिकूच नये अशी परिस्थिती भाजपने देशात निर्माण केल्याचा आरोप मंत्री लाड यांनी केला.
पत्रकार परिषदेला आ. राजू सेठ, आ. महेंद्र तम्मण्णावर आदी उपस्थित होते.

Tags: