Belagavi

कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या सुवर्णमहोत्सवाबाबत बैठक

Share

कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या स्थापनेला येत्या 24 जानेवारी 2024ला 50 वर्षे पूर्ण होत असल्याने सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती समितीचे राज्य संचालक एम. गुरुमूर्ती यांनी दिली.

दलित संघर्ष समितीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बेळगावात आज, रविवारी कन्नड साहित्य भवनात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी समितीचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी राज्य संचालक एम. गुरुमूर्ती यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एम. गुरुमूर्ती यांनी सांगितले की, दलितांवरील वाढते अत्याचार रोखणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने प्रा. बी. कृष्णप्पा यांनी दलितांवरील अन्याय, अस्पृश्यता दूर करण्यासाठी समाजोद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन 24 जानेवारी 1974 रोजी कर्नाटक दलित संघर्ष समितीची स्थापना केली होती.
त्यांच्या अथक प्रयत्नातून सरकारला पीटीसीएल कायदा आणावा लागला. त्यामुळे दलितांना मंजूर झालेल्या ज्या जमिनींची विक्री झाली होती, त्या जमिनी मूळ लाभार्थी दलितांना परत मिळणे शक्य झाले. दलित संघर्ष समितीने नंगावस्थेत दलित महिलांकडून करवली जाणारी देव-देवतांची पूजा करण्यास प्रतिबंध करून तो दंडनीय अपराध ठरविणारा कायदा 1996मध्ये मंजूर करणे सरकारला भाग पाडले. समितीच्या कार्यात सहभागी होऊन आज अनेकजण प्रथितयश लेखक, नाटककार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते झाले आहेत. गेल्या 50 वर्षांत समितीने अनेक समाजोपयोगी, क्रांतिकारी कामे केली आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा उपक्रम सुवर्णमहोत्सवी वर्षात राबविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरात दौरे करीत असून, आज बेळगावात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक आणि चर्चासत्र घेतले आहे. अशा उपक्रमांत निष्कर्ष, सल्ला-सूचनांच्या आधारे 24 जानेवारी 2024 रोजी बेंगळूर येथे राज्यस्तरीय भव्य परिषद भरविण्यात येणार आहे असे एम. गुरुमूर्ती यांनी सांगितले.

दलित संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश मादार यांनी सांगितले की, दलितांवरील अन्याय-अत्याचार दूर करण्यासाठी गुरुमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली प्रा. बी. कृष्णप्पा स्थापित दलित संघर्ष समितीच्या बेळगाव जिल्हा शाखेची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दलितांच्या उद्धारासाठी जिल्हा शाखा कार्यरत राहणार आहे.
यावेळी हनुमंतय्या काकरगल, महावीर मोहिते. रमेश सन्नक्की, सुरेश ऐहोळे आदी उपस्थित होते.

Tags: