चिक्कोडी येथे भाजप रयत मोर्चातर्फे राज्य काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.

खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गांधी कट्टा ते मिनी विधानसौधपर्यंत निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी माधव गित्ते यांच्यामार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, मागील भाजप सरकारने अनेक शेतकरी हिताच्या योजना राबविल्या होत्या. परंतु काँग्रेस सरकारने शेतकरी हिताच्या योजना डावलल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. तसेच अनेक हमी सरकारने दिल्या आहेत. मात्र या योजनांमुळे शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही. सध्या पुरेशा पावसाविना शेतकऱ्यांची पिके सुकत चालली आहेत.
अजूनही दुष्काळ जाहीर केला जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकरी हिताच्या योजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी प्रदेश भाजप रयत मोर्चा राज्य उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवाडे, भाजप चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, महिला मोर्चा अध्यक्षा शांभवी अश्वथपुर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, मंडळ अध्यक्ष संजय पाटील, सतीश आप्पाजीगोळ, विक्रांत देसाई, नागेंद्र जोशी, शकुंतला डोणवडे, आप्पासाहेब चौगले आदी उपस्थित होते.


Recent Comments