व्याजी धंदा करणाऱ्या सफाई काँट्रॅक्टर आणि त्याच्या सुपरवायजरने पगार न देता केलेल्या छळाला कंटाळून एका पौरकार्मिकाने आत्महत्या केली. ही घटना बेळगावातील गणेशपूर येथील क्रांतीनगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडली.
गणेशपूरमधील क्रांतीनगरमध्ये राहणाऱ्या शशिकांत सुभाष ढवाळे या तरुण पौरकार्मिकाने गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गणेशपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शशिकांत ढवाळे हा गेल्या दहाबारा वर्षांपासून बेळगाव महापालिकेत एन. डी. पाटील नामक सफाई कंत्राटदाराकडे पौरकार्मिक म्हणून काम करत होता. त्याने आर्थिक अडचणीमुळे कंत्राटदार पाटील यांच्याकडून 20% व्याजाने 80 हजार रुपये घेतले होते. त्यापोटी व्याजासह त्याने 1 लाख 30 हजार रुपये परत केले होते. तरीही कंत्राटदार एन. डी. पाटील व त्याचा सुपरवायजर शंकर अष्टेकर याने आणखी पैसे देण्यासाठी तगादा लावला होता. त्याशिवाय अनेक महिन्यांपासून शशिकांतचा पगारही दिला नव्हता. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. व्याजासह पैसे फेडून आणि काम करूनही पगार न दिल्याने त्याने दारूच्या नशेत मानसिक तणावाखाली गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. याबाबत त्याची बहीण मीनाक्षी दीपक लाखे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
शशिकांतची पत्नी प्रियांका यांनी सांगितले की, दर महिन्याला कंत्राटदार कर्जाची, व्याजाची फेड म्हणून शशिकांतला पगार ठेवून घेत होता. उलट आणखी पैसे दे असा कंत्राटदार पाटील व त्याचा सुपरवायजर शंकर अष्टेकर यांनी तगादा लावून अतोनात मानसिक छळ करीत होते. त्यामुळे शशिकांत मानसिक तणावाखाली येऊन दारूच्या आहारी गेला होता. त्यातूनच काल रात्री घरातील सगळेजण झोपेत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी उठल्यावर आमच्या निदर्शनास हा प्रकार आल्याचे प्रियांका हिने सांगितले.
दरम्यान, पौरकार्मिक शशिकांतच्या आत्महत्येमुळे बेळगावातील दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्येष्ठ दलित नेते मल्लेश चौगुले यांनी सांगितले की, शशिकांत ढवाळे गेल्या 10-12 वर्षांपासून बेळगाव महापालिकेत स्वच्छता कंत्राटदार एन. डी. पाटील यांच्याकडे पौरकार्मिक म्हणून काम करत होता. वैयक्तिक आर्थिक अडचणीपोटी त्याने पाटील यांच्याकडून 80 हजार रुपये घेतले होते. त्यावर कंत्राटदाराने चक्रवाढ व्याज आकारले. शशिकांतने 80 हजारापोटी 1 लाख 30 हजार रुपये परत करूनही आणखी पैशासाठी कंत्राटदार एन. डी. पाटील व त्याचा सुपरवायजर शंकर अष्टेकर हे शशिकांतचा छळ करत होते. एकूण दीड लाख रुपये दे म्हणून त्यांनी शशिकांतचा पगारही रोखला होता. त्याला पत्नी व चार मुले आहेत. त्याच्या मागे या गरीब कुटुंबाचे पोट कसे भरणार? अनुसूचित जातींमधील तळागाळातील डोंबारी समाजाच्या शशिकांतची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे त्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार एन. डी. पाटील व त्याचा सुपरवायजर शंकर अष्टेकर यांनी त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, त्याच्या पत्नीला कामावर घ्यावे अन्यथा हे प्रकरण जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त आई शासन दरबारी धसास लावून त्या दोघांना धडा शिकवू असा इशारा मल्लेश चौगुले यांनी दिला.
दरम्यान, शशिकांतच्या मृत्यूला न्याय देण्याच्या मागणीसाठी गणेशपुरातील डोंबारी समाजाच्या नागरिकांनी कॅम्प पोलीस ठाण्यासमोर काही काळ निदर्शने केली. पोलिसांची या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
एकंदर, कंत्राटदाराच्या व त्याच्या सुपरवायजरच्या छळाला कंटाळून पौरकार्मिकाने आत्महत्या केल्याने डोंबारी समाजात खळबळ उडाली असून, दलित संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता सरकार यावर काय कारवाई करणार हे पहावे लागेल.



Recent Comments