Belagavi

सौजन्या प्रकरणी प्रगतीपर संघटनांच्या महासंघातर्फे बेळगावात आंदोलन

Share

धर्मस्थळजवळ 11 वर्षांपूर्वी सौजन्या या अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणाचा विशेष तपास पथकाद्वारे तपास करून खऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा प्रगतीपर संघटनांच्या महासंघातर्फे बेळगावात आज आंदोलन छेडण्यात आले.

सौजन्या अपहरण, बलात्कार व हत्या प्रकरणाचा फेरतपास करण्याची मागणी कर्नाटकात पुन्हा जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली फेरतपास करून खऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव जिल्हा प्रगतीपर संघटनांच्या महासंघातर्फे म्हैसूरच्या ओरनाडू संस्थेच्या सहयोगाने बेळगावात आज आंदोलन छेडण्यात आले. शहरातील कन्नड साहित्य भवनासमोर जमलेल्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत निदर्शने केली.

यावेळी बोलताना म्हैसूरच्या ओरनाडू संस्थेच्या प्रतिनिधीने सांगितले की, सौजन्या हत्या प्रकरणाच्या तपासात पोलीस अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवल्यानंतर, त्यांच्यावर कारवाई करावी, खऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात यासाठी राज्यभरात प्रगतीपर संघटनांनी आंदोलन छेडले आहे. त्यानुसार बेळगावात आज आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा निपक्ष तपास होऊन सौजन्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असे त्यांनी सांगितले. बाईट.
बेळगाव जिल्हा प्रगतीपर संघटनांच्या महासंघाच्या अध्यक्षा किरण बेडी यांनी सांगितले की,

11 वर्षांपूर्वी सौजन्या या अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. एवढे गंभीर प्रकरण घडूनदेखील तपास अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे आरोपीना संरक्षण दिल्याचे दिसून येते. 11 वर्षांपासून तिला न्याय मिळत नाही. तो मिळावा यासाठी सतत आंदोलने केली गेली. मात्र संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी गप्प आहेत. त्यामुळे सर्वकाही माहिती असूनही त्यांनी अंध, मूक आणि बहिऱ्याची भूमिका त्यांनी घेतली आहे का? या प्रकरणाचा सीबीआयकडून फेरतपास करून खऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली.

संघटनेच्या आणखी एक पदाधिकारी सुशीला यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यातील प्रगतीपर विचारांच्या 28 संघटनांनी मिळून सौजन्याला न्याय मिळवून देण्यासाठी बेळगावात आज एल्गार पुकारलाय. या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकरवी निपक्ष चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. सौजन्याला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असे त्यांनी सांगितले. बाईट.
यावेळी प्रगतीपर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सौजन्या हत्या प्रकरणाचा निपक्ष फेरतपास करा, सौजन्याला न्याय मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.

Tags: