Belagavi

भाजप राज्यात कधीच स्वबळावर सत्तेत येणार नाही : एच. विश्वनाथ

Share

भारतीय जनता पक्ष कर्नाटकात कधीच स्वबळावर सत्तेत आलेला नाहीय अन यापुढेही येणार नाही असे भाकीत माजी मंत्री एच. विश्वनाथ यांनी आज पुन्हा वर्तवलं. त्याचबरोबर रमेश जारकीहोळी यांनी शांत रहावे, जरा बुद्धीचा वापर करावा असा सल्लाही त्यांनी दिला.
बेळगावात रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री एच. विश्वनाथ म्हणाले की, भाजप कधीच राज्यात स्वबळावर सत्तेत आलेला नाहीय. एकदा ते कुमारस्वामींच्या खांद्यावर बसून सत्तेत आले अन दुसऱ्यावेळी आमच्या खांद्यावर बसून, त्यांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. ती कधीच त्यांना साथ देणार नाही. त्यामुळे भाजप स्वबळावर पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही असे भाकीत त्यांनी वर्तवले. काँग्रेस सरकार निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दाला जागत आहे. एकापाठोपाठ गॅरंटी देत आहे. या सरकारला काम करण्यास वेळ दिला पाहिजे. उगाचच सतत टीकाटिप्पणी करण्यात अर्थ नाही असा टोला त्यांनी भाजप व कुमारस्वामींना लगावला.
भाजप नेते सी. टी. रवी यांच्या काँग्रेस नेत्यांवरील कमिशनच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, कमिशन घेणारे घरी गेले, का घरी गेला? जिंकला का नाहीत? तुमच्या बाजूला असणाऱ्यानेच तुम्ही काय अन किती भ्रष्टाचार केलाय हे जनतेला सांगितलेय. निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने, बोम्मई यांनी थोड्याथोडक्या नव्हे तर दीड लाख कोटी रुपयांच्या निविदा मंजूर केल्या. आता ती बिले कोण मंजूर करणार? एकमेकांवर चोर असल्याचा आरोप करण्यात काय अर्थ आहे? चोर कोण हे जनता ठरवते असा टोला विश्वनाथ यांनी हाणला. एच. डी. कुमारस्वामींच्या पेन ड्राइव्ह बॉम्बवर प्रतिक्रिया देताना, राजकीयदृष्ट्या कुमारस्वामी यांचे काय स्थान आहे? ते कुठे जाऊन बसलेत? याचा त्यांनी विचार करावा असा चिमटा त्यांनी काढला.
रमेश जारकीहोळी यांना काय सल्ला द्याल? या प्रश्नावर रमेश माझे चांगले मित्र, मंत्री होते. काही कारणांमुळे त्यांचे मंत्रिपद गेले. त्यांनी 17 जणांना घेऊन भाजपला सत्तेत आणले. नंतर त्यांना काय मिळाले? आता कुठे आहेत, याचा त्यांनी विचार करावा, यातून धडा घ्यावा, जरा बुद्धीचा वापर करावा असा सल्ला विश्वनाथ यांनी दिला. देशातील पक्षीय राजकारण संपले असून, नेता, व्यक्तिकेंद्रित राजकारण सर्वत्र सुरु झाले आहे. राजकीय पक्षांमधील आंतरिक लोकशाही संपली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. म्हैसूरमधून लोकसभा लढवणार का? या प्रश्नावर, का नाही? मी काँग्रेसमधूनच खासदार झालो होतो, 40 वर्षे राजकारणात आहे. सर्वाधिक काळ काँग्रेसमध्ये होतो. जेडीएस पक्षाध्यक्ष म्हणूनही काम केले. माझा झेंडा बदलेल, पण अजेंडा बदलणार नाही असे सांगून काँग्रेसला उमेदवारीबाबत एकदा विचारून बघेन असे उत्तर एच. विश्वनाथ यांनी दिले.
एकंदर, विविध विषयांवर माजी मंत्री एच. विश्वनाथ यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: