Belagavi

घराची भिंत कोसळून गरीब विणकर कुटुंब रस्त्यावर 

Share

बेळगाव शहरात मुसळधार पावसामुळे वडगाव येथील नेकार ओणी येथे बळ्ळारी नाल्याचे पाणी घरात घुसल्याने घराची भिंत कोसळून गरीब विणकर कुटुंब रस्त्यावर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. सखल भागात पाणी साचून घरांमध्ये घुसत आहे. शहराबाहेरील बळ्ळारी नाल्याला पूर येऊन त्याचे पाणी शेतवडीत आणि वसाहतीत घुसले आहे. वडगाव परिसरातील अनेक वसाहती आणि गल्ल्यांमधील घरांमध्ये घुसलेल्या पाण्याने रहिवाशांची दाणादाण उडवली आहे.

वडगावमधील कल्याणनगरातील नेकार ओणी येथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील प्रेमा परशराम ढगेन्नावर या गरीब विणकर विधवा महिलेच्या घरात पाणी घुसून भिंत कोसळल्याने हे कुटुंब रस्त्यावर आले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, काल मध्यरात्री जोरात आवाज होऊन घराची भिंत कोसळली. त्या आवाजाने जागे होऊन मुलांना उठवले. वीजमागाचे मीटर कोसळणार होते. मुलांना सांगून भिंतीला टेका द्यायला लावला. घरात गुडघाभर पाणी साचून साहित्याचे नुकसान झाले आहे. वीजमाग पाण्यात बुडाल्याने व्यवसाय ठप्प आहे. तशात आता भिंत कोसळल्याने आम्ही संकटात आहोत. स्थानिक नगरसेवकांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. कोरोना काळातही आमच्या घराचे पावसाने नुकसान झाले होते. त्यावेळी माझे पती परशराम ढगेन्नावर यांनी मदतीसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले. पण सरकारकडून कसलीही मदत झाली नाही. त्या टेन्शनमध्येच त्यांचा मृत्यू झाला. आता घर कोसळत चालल्याने आम्ही रस्त्यावर आलो आहे. सरकारने त्वरित पाहणी करून नुकसान भरपाई मंजूर करावी अशी मागणी त्यांनी केली.

त्यांचा मुलगा मंजुनाथ ढगेन्नावर यांनी सांगितले की, जीर्ण झालेल्या घरांबाबत आम्ही महापालिका, तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून मदतीची याचना केली. परंतु अजूनही कसलीच मदत मिळालेली नाही. आता भिंत पडून संपूर्ण घरच कोसळण्याची भीती आहे. सरकारने आम्हाला त्वरित मदत करावी.

पाच वर्षांपूर्वी अतिवृष्टी झाली तेव्हा जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी छप्पर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. आता पावसामुळे घरे कोसळू लागली आहेत. जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नेकार ओणी येथे भेट देऊन येथील जनतेच्या समस्यांची पाहणी करून दिलासा द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

Tags: