खानापूरसह राज्यातील डोंगराळ भागात लहान पूल बांधून शाळकरी मुले व ग्रामस्थांना नद्या ओलांडणे सोयीचे व्हावे यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहेत . असे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले .
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खानापूर तालुक्यातील भुरणकी गावाला भेट देऊन घराच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नदी ओलांडणे सोयीचे व्हावे यासाठी पाच ते दहा लाख रुपये खर्चून छोटा पूल बांधण्याचा विचार करण्यात आला आहे. तसेच खानापूर तालुक्यात पूल बांधणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे
सध्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांना मार्गदर्शक सूचनांनुसार भरपाई दिली जात आहे. मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, पूर्णपणे कोसळलेल्या घरांच्या बांधकामासाठी पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी कारवाई केली जाईल. नोव्हेंबरनंतर रस्ता बांधकामाचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
खानापुर तालुक्यात ८७ घरांची अंशत: पडझड झाली आहे . पावसाचा जोर वाढल्याने चार घरांची पडझड झाली आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. त्याचप्रमाणे नुकसानीचे प्रमाणही वाढू शकते, असे ते म्हणाले.
संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. ते म्हणाले की, वेदगंगा-दूधगंगा यासह सर्व नद्यांच्या आवक दरावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, आलमट्टी जलाशय भरल्यानंतर आवक लक्षात घेऊन तेवढाच पाणी सोडण्यात येईल.
खानापूर तालुक्यातील भुरणकी गावात पावसामुळे घराची भिंत कोसळून झालेल्या घराची पाहणी करून जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दोन कुटुंबांना प्रत्येकी १.२० लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप केले.
खैरुन्नीसा हरेकर आणि गोपाल तरोडकर यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईचा धनादेश मिळाला.
नुकसान भरपाईच्या धनादेशासोबतच तांदूळ, गूळ आणि दैनंदिन वापरासाठी चहा पावडरसह अन्नधान्य किटही पीडित कुटुंबांना देण्यात आले.

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, उपविभागीय अधिकारी राजेश नायक, तहसीलदार प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते.
यानंतर जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भुरणकी ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला .


Recent Comments