मुसळधार पावसामुळे बेळगावात बळ्ळारी नाल्यासह अनेक नाले आणि गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहात आहेत. त्यामुळे शहर-उपनगरातील अनेक सखल भागातील वसाहती पाण्याखाली बुडाल्या आहेत. असंख्य घरांतून पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत असून पावसाने त्राही मम् म्हणण्याची वेळ आली आहे.

होय, गेल्या आठवडाभरापासून पश्चिम घाटात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बेळगाव शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागातील अनेक वसाहती पाण्याखाली बुडाल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, लोकांना घरात पाय ठेवणे कठीण झाले आहे. अनेक नागरिकांनी घराला टाळे ठोकून कुटुंबकबिल्यासह नातेवाईक, मित्रमंडळींकडे आश्रय घेतला आहे. फ्लो
बेळगावातील वडगाव भागातील अनेक वसाहतींमध्ये पाणी साचून रस्ते बंद झाले आहेत. त्याशिवाय घरांत पाणी घुसल्याने रहिवाशांची दाणादाण उडाली आहे. विशेषतः प्रभाग क्र. 50 मधील संभाजीनगर, केशवनगर, गणेश कॉलनी, राघवेंद्र कॉलनी, अन्नपूर्णेश्वरी नगर या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. या भागात घरोघरी वीजमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. मात्र घरात पाणी आले आहे. अर्ध्याहून अधिक वीजमाग बुडतील इतके पाणी घरात शिरले आहे. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीय. पंपसेट लावून घरातील पाणी बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न नागरिक करत आहेत. महापालिकेने गटारी व नाल्यांची सफाई योग्य प्रकारे केली नसल्याने हा प्रकार उदभवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घरात घुसलेल्या पाण्यापासून पळ काढण्याची वेळ लोकांवर आली आहे. दरम्यान नगरसेविका सारिका पाटील यांनी पूरग्रस्त वसाहतींना भेट देऊन पाहणी केली. रहिवाशांशी संवाद साधून पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
वडगावप्रमाणेच अमननगरचीही अवस्था झाली आहे. या वसाहतीत बहुतांश लोक गरीब आहेत. छोटीमोठी घरे बांधून राहिलेल्या या लोकांना पावसाच्या पाण्याने हैराण करून सोडले आहे. वसाहतींमधील रस्ते पाण्याखाली गेल्याने संचारास अडथळा येत आहे. पाण्याने भरलेल्या रस्त्यांतूनच नागरिकांची येजा सुरु आहे.


Recent Comments