आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांची संयुक्त बैठक आज बेंगळूर येथे पार पडली. देशभरातील २६ पक्ष या बैठकीला हजर होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA) असे नाव देण्यात आले आहे
.
लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या फॉर्म्युलासह या पक्षाच्या आघाडीला नाव ठरवण्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीचं नाव जाहीर केलं आहे. India या संक्षिप्त रुपाचा पूर्ण अर्थ Indian National Development Inclusive Alliance असा होतो.
विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्यावेळी पुढची बैठक जुलै महिन्यात होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, काल सायंकाळपासून २६ पक्षातील नेते एकत्र आले. यामध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शरद पवारही सहभागी झाले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की, विरोधकांची पहिली बैठक पाटणा येथे पार पडली. त्यानंतर आज दुसरी बैठक बंगळुरूत होत आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे होईल. आम्ही आता २६ पक्ष एकत्र आलो आहोत. आधीच्या बैठकीत २० पक्ष आले होते. पाटणा येथे येणं काही पक्षाच्या नेत्यांना शक्य झालं नव्हतं. त्यामुळे तेव्हा तिथे तुम्हाला कमी पक्ष दिसले. परंतु आता आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाचे धाबे दणाणले आहेत. आमची ही बैठक पाहून त्यांनी एनडीएच्या ३० पक्षांची बैठक बोलावली आहे.

बंगळुरूमध्ये जमलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ही चांगली, अर्थपूर्ण बैठक आहे. यात अनेक विधायक निर्णय घेतले आहेत. बैठकीत झालेल्या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो.” बाईट.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात जवळपास प्रत्येक क्षेत्राला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे आणि आता त्यांच्यापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे.”
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आजची विरोधी पक्षांची दुसरी बैठक यशस्वी झाली आहे. हुकूमशाहीच्या विरोधात आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो आहोत. वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष कसे एकत्र राहतील असा प्रश्न विचारला जातो. राजकारणात वेगळी विचारधारा असलीच पाहिजे. त्यालाच लोकशाही म्हणतात. एक विचारधारा, एक व्यक्ती वा पक्ष म्हणजे लोकशाही नव्हे. पूर्वी स्वातंत्र्यासाठी लढा झाला. आता स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे. म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. जनतेने आता घाबरायची गरज नाही. बाईट.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया या नावाचा अर्थ सांगून, ही लढाई एनडीए विरुद्ध विरोधक अशी नसून, देशाचा आवाज दाबणाऱ्यांच्या विरोधातील लढाई आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष देशासाठी काय करायचं हे बोलू, ठरवू. देशातील जनतेचा पैसा लुटून तो मोदींच्या आणि भाजपच्या जवळच्या उद्योगपती मित्रांना पुरवला जातोय. वाढती बेरोजगारी, महागाई कमी करण्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करून आपल्या खास मित्रांना मदत करतेय असा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षांची आघाडी या विरोधात समर्थपणे लढा देईल असे त्यांनी सांगितले.


Recent Comments