हमी योजनांच्या आनंदात असणाऱ्या राज्यातील जनतेला आता, सांगा जगायचं कसं? पोटाला चिमटा काढत की रडत कुढत? असा प्रश्न पडला आहे. डाळी, टोमॅटो, कोथिंबीरसह भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सरकारने हस्तक्षेप करत दरवाढ कमी करावी अशी मागणी ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी सुबानी मुल्ला यांनी घेतलेला बेळगाव बाजारपेठेचा हा आढावा…
होय, एकीकडे पावसाने दिलेली ओढ अन दुसरीकडे पिकांना बसलेला फटका यामुळे होत असलेली जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने मेटाकुटीला आली आहे. बेळगाव बाजारपेठेत सर्वप्रकारच्या पालेभाज्या, मूग, तूरडाळीसह सर्वप्रकारच्या डाळी जोंधळा, तांदूळ, तेल, मसाले आदी सर्वच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगायचे कसे हा प्रश्न पडला आहे. डाळींच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे जेवणातून डाळ विशेषतः तूरडाळ गायब झाली आहे. कोथिंबीर आणि टोमॅटोचे दर वाढल्याने गृहिणींनी कोथिंबीर आणि टोमॅटोलाही सध्या बाय केला आहे. खाद्यतेलाचे दर सध्या बऱ्यापैकी स्थिर असले तरी सगळ्यांच्याच आवाक्यातले नाहीत अशी स्थिती आहे. पाऊस लांबल्याने भाजीपाला उत्पादनही फटका बसला आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरातही चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे खायचे-जेवायचे काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लवकर पुरेसा पाऊस झाला तरच नवीन मालाची बाजारपेठेत आवक वाढून दर कमी होण्याची आशा आहे. मात्र पाऊस पुन्हा लांबल्यास किंवा कमी प्रमाणात झाल्यास आणखी दरवाढ होऊ शकेल अशी भीती बेळगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
टोमॅटो आणि तुरडाळीच्या किंमतीत झालेली वाढ ही शालेय मुलांसाठीही मारक ठरण्याची शक्यता आहे. शाळांत पुरवली जाणाऱ्या माध्यान्ह आहारात टोमॅटो, तूरडाळ वापरली जाते. परंतु आता दरवाढीमुळे माध्यान्ह आहाराचे वितरक शाळेतील मुलांच्या जेवणात अन्य डाळींचा पर्याय अवलंबण्याचा विचार करीत आहेत.
डाळींचे विशेषतः तूरडाळीचे उत्पादन कर्नाटकात फारसे होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून तूरडाळ आयात केली जाते. कर्नाटकात उत्पादन कमी असल्याने गुलबर्गा वगळता कर्नाटकातून डाळींची आयात मोठ्या प्रमाणात होत नाही. महाराष्ट्रातील लातूर, उदगीर, बार्शी भागातून बेळगावात तूरडाळीची आयात मोठ्या प्रमाणात होते. सध्या तेथील स्थानिक बाजारपेठेत 145 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी होते. हमाली, वाहतूक खर्च मिळून 150, 155 रुपये प्रतिकिलो दराने बेळगाव बाजारपेठेत तूरडाळीचे विक्री केली जाते अशी माहिती होलसेल व्यापारी महारुद्र भुजन्नावर यांनी दिली. तांदळाच्या दरातही साधारण 5 रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. कर्नाटकातील दावणगेरे, गंगावती आदी भागातून बेळगाव बाजारात तांदळाची आवक होते. पाऊस लांबल्याने स्थानिक शेतकरी आपल्याकडील तांदळाची विक्री करत नाहीयेत. त्यामुळे बाजारपेठेत तांदळाची आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी एक व्यापारी मिलिंद पाटणेकर यांनी मात्र तूर व हरभरा वगळता अन्य डाळींचे दर बऱ्यापैकी स्थिर असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, गेल्यावर्षी सगळीकडेच तूरडाळीचे उत्पादन कमी झाल्याने आवक कमी होऊन दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी मटारचे उत्पादन घातल्याने मटारचा प्रतिकिलो दर 200 रुपयांवर पोहोचला होता. त्या तुलनेत यंदा हाच दर 80 रुपये किलो इतका आहे. बेळगावात महाराष्ट्रातील लातूर, उदगीर, बार्शी तर कर्नाटकातील गुलबर्गा येथून तूरडाळीचे आवक होते. हरभरा इंदूर, लातूर येथून तर मूगडाळीची आवक गुलबर्ग्याहून होते. सध्या बेळगाव बाजारात डाळींचे दर सरासरीइतके असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट.
यासंदर्भात आनंदवाडी येथे राहणारे विजयकुमार यांनी, सरकारने त्वरित हस्तक्षेप करून जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रोखावी अशी मागणी केली. दरवाढ होत असली तरी पगार मात्र तेवढेच आहेत. सरकार महिलांना दरमहा दोन हजार रुपये देत आहे हे खरे. पण पुरुषांनी काय घोडे मारलंय? फक्त महिलांच्या मतांवर सरकार निवडून आले आहे का? असा त्रागा त्यांनी व्यक्त केला.

मुकेश ठाकूर यांनी सांगितले की, तूरडाळ 150 ते 160 रुपये किलो इतकी महाग झाली आहे. अन्य डाळी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे सरकारने दरवाढ रोखण्यासाठी पावले उचलावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बाईट.
एकंदरीत, लांबलेल्या हंगामी पावसामुळे आवश्यक किराणा मालाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. टोमॅटोच्या पिकासह इतर डाळींच्या किंमतींच्या वाढीमुळे लोकांना काळजी वाटू लागली आहे.


Recent Comments