award

जायंट्स मेनच्या वतीने मातृपितृ पूजन सोहळा

Share

निस्वार्थ आणि निर्व्याज जर नातं कोणतं असेल तर ते आईबाबांच आहे असे ऍडव्होकेट सरिता पाटील यांनी सांगितले.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने संघटनेच्या सदस्यांच्या मातृपितृ पूजन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आईवडिलांनी आपल्यावर केलेल्या ऋणातून मुक्त होणे कदापि शक्य नाही तरी त्यातून थोडेतरी उतराई व्हायचा प्रयत्न या माध्यमातून आपण केलात हे पाहून मन भरून आलं. असे कोणतेही घर नाही तिथे कुरबुरी नसतील पण नविन दिवसाची सुरुवात करताना काल काय झालं ते विसरून गेल्यास नात्यामध्ये गोडवा राहील असेही त्या म्हणाल्या.

शेवटी वृद्ध मात्यपित्यांना विनंती केली की उतारवयात थोडं अध्यात्माकडे वळा, आपले छंद जोपासा, व्यायाम करा आपल्या मित्रांसोबत वेळ व्यतीत करा जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहील.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिल मूतगेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पी जी घाडी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक करताना मदन बामणे यांनी आयुष्य एक दिवा आहे पण त्या दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजे आईवडील आहेत त्यांच्याप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे परम कर्तव्य आहे आणि हे व्यक्त करण्यासाठीच आम्ही संसारक्षम असा हा मातृ पितृ पूजन सोहळा आयोजित केला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या नंतर सौ सुरेखा व श्री बाबुराव यांचे मदन बामणे व सुनिल भोसले यांनी पाय धुवून, हळदकुंकू लावून पुष्पवर्षाव करून पूजन करण्यात आले.

त्यानंतर शांता मुतगेकर, राधिका बेलवलकर, यशोदा पाटील, उर्मिला रेडकर, सुरेखा हुली, यमुना पाटील, मालनताई पालकर यांचे अनुक्रमे सुनिल मुतगेकर, राहुल बेलवलकर, शरद पाटील, महेश रेडेकर, पद्मप्रसाद हुली, शिवराज पाटील यांच्याहस्ते पाद्यपूजा करण्यात आली व शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी संपूर्ण सभागृह भावनाविवश झाले होते. सर्वच मातांच्या आणि वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवत होते. यानंतर प्रमुख पाहुणे पी जी घाडी यांनी आपले विचार व्यक्त करताना आईवडिलांच्या प्रति आज जो आदर व्यक्त केला गेला त्यामुळे मी भारावून गेलो असल्याचे सांगितले.
अध्यक्ष सुनिल मुतगेकर यांनी आईवडील हे माऊलीचे रूप असून आम्हाला मोठे करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा असतो यामुळे हा कार्यक्रम माझ्या अध्यक्षतेखाली झाला हे माझे भाग्य समजतो असे सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष अनंत लाड यांनीही आपले विचार व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष अरुण काळे, खजिनदार विजय बनसूर, अरविंद देशपांडे, ईश्वर पाटील, गावडू पाटील, प्रेमानंद गुरव, पांडुरंग पालेकर, अनिल चौगुले, विनोद आंबेवाडीकर, सुरेश पिसे, मोहन पत्तार उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक हलगेकर यांनी केले. अविनाश पाटील यांनी आभार मानले.

Tags: