Belagavi

बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाची प्रगती आढावा बैठक

Share

व्हॅक्सीन डेपोत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काम सुरू करण्याबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या.
बेळगाव स्मार्ट सिटी कार्यालयात शनिवारी आयोजित स्मार्ट सिटी अंमलबजावणी आणि प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्हॅक्सिन डेपोवरील कामाची परवानगी घेणे, काम पूर्ण झाल्यानंतर त्याची योग्य देखभाल करणे या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करू, असे ते म्हणाले.


स्मार्ट सिटीचे काम सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी दिली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ हेरिटेज पार्कच्या विकासासाठी मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या संभ्रमाचा खुलासा करावा, जर लेखी परवानगी दिली असेल तर त्याबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शिल्लक 19 कोटी रुपये निधीचा विनियोग करण्यासाठी योग्य प्रस्ताव तयार करावा. टिळकवाडी येथील शहर बसस्थानक व कलामंदिरासह सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.
विश्वेश्वरय्या नगरमध्ये 51 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्राचा लाभ महानगरपालिका, पोलीस, आरोग्य, परिवहन व इतर विभागांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले.
अंगणवाडी केंद्राच्या विकासासाठी 80 लाख रुपये खर्च झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून कामांची छायाचित्रे पाहून एवढा खर्च झाल्याबाबत शंका मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली. याबाबत सविस्तर माहिती देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
स्मार्टसिटी अंतर्गत दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात हजारो कोटींची कामे झाली आहेत. मात्र महापालिका हद्दीत येणाऱ्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भागाच्या विकासासाठी एक रुपयाही दिला जात नसल्याबद्दल मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या अखत्यारीतील ग्रामीण भागात केलेल्या कामांची लेखी माहिती देण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
ग्रामीण भागात किमान कामे करूनही त्यांनी उदासीनता दाखवली, असा टोला त्यांनी अधिकाऱ्यांवर लगावला.
स्मार्टसिटीच्या शिल्लक निधीत ग्रामीण मतदारसंघातील कामांनाच प्राधान्य द्यावे, अशी विनंती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्हा पालक मंत्र्यांना केली.
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रत्येक कामाची सविस्तर माहिती देण्यास सांगितले.
बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील म्हणाले की, व्हॅक्सीन डेपोमध्ये स्मार्ट सिटीच्या कामांसाठी झाडे तोडली गेली असतील तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी असतील तर सर्व कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.


शहरात एकूण 53 कि.मी. व्हाईट टॉपिंगसाठी एवढा पैसा खर्च झाल्याबद्दल विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी आश्चर्य व्यक्त केले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या विविध दालन, कलादालन आदींमधून किती महसूल मिळू शकतो, याची चर्चा यापूर्वीच झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे उत्पन्न सुरू झाले नाही. महसूल सुरू झाल्यानंतर त्याचे व्यवस्थापन त्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
बेळगाव स्मार्ट सिटीच्या एमडी सईदा आफरीन बानू बेल्लारी आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी एकूण प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती दिली. एकूण 930 कोटी खर्चाची 102 कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी 96 कामे पूर्ण झाली आहेत. सहा प्रगतीपथावर आहेत. याशिवाय पीपीपी मॉडेल अंतर्गत 211 कोटी रुपये खर्चाची 6 कामे हाती घेण्यात आली असून एक पूर्ण झाले आहे असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Tags: