Belagavi

अन्नभाग्यसाठी तांदूळ नाकारून केंद्राचे राजकारण : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ देण्यास नकार देऊन केंद्र सरकार यात केवळ राजकारण करीत आहे असा आरोप महिला व बालकल्याण, अपंग पुनर्वसन आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.

बेळगाव तालुक्यातील हलगा-बस्तवाड येथे रविवारी सत्कार समारंभात भाग घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, राज्य काँग्रेस सरकारच्या गृहज्योती योजनेसाठी आजपासून अर्ज मागवत आहोत. याबाबत वृत्तपत्रांत, प्रसारमाध्यमांत जाहिराती देऊन, पत्रकार परिषदांमधून माहिती देऊन जागृती केली आहे. गृहलक्ष्मी योजनाही लवकरच जारी करण्यात येईल. त्यासाठीही अर्ज मागवण्यात येतील. राज्यातील सुमारे 1कोटी 28 लाख कुटुंबांपैकी 1 कोटी 13 लाख कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एकदा योजना जारी केली की तिच्या अंमलबजावणीत कसलीही अडचण येऊ नये यासाठी विशेष सॉफ्टवेअर, ऍप तयार करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाली की लगेचच गृहलक्ष्मी योजना लागू केली जाईल असे त्यांनी सांगितले. मोफत बसप्रवासाच्या स्त्रीशक्ती योजनेचा लाभ राज्यातील असंख्य महिला घेत आहेत. देवस्थान, तीर्थक्षेत्रांना भेटी देत आहेत. त्यांना पुण्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त करून सिद्दरामय्या सरकार आल्यापासून राज्यातील महिलांना चांगले दिवस आल्याचा दावा मंत्री हेब्बाळकर यांनी केला.


भारतीय अन्न महामंडळाने राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ देण्याचे आधी मान्य केले होते. मात्र नंतर नकार दिला. केंद्र सरकार केवळ राजकारण करून या योजनेत खोडा आणू पहात आहे असा आरोप मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. यामुळे राज्यातील जनतेने काळजी करण्याचे कारण नाही. केंद्र सरकार कितीही अडथळे आणू देत, आम्ही जनतेला मोफत तांदूळ दिल्याशिवाय राहणार नाही. शेजारील तेलंगण, छत्तीसगड आणि अगदी पंजाब सरकारशी आमची चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक माहिती अन्नमंत्री देतील असे त्यांनी स्पष्ट केले. म्हादईच्या लढ्यात महाराष्ट्र गोवा सरकारसोबत असेल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाबाबतच्या प्रश्नावर, मी आजच बेंगळूरहून परतलीय, त्याची मला माहिती नाही, माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. बाईट
एकंदर, केंद्रातील भाजप सरकारने अन्नभाग्यसाठी तांदूळ देण्यास केवळ राजकारणातून नकार दिल्याचा आरोप करून, काहीही झाले तरी राज्यातील जनतेला आम्ही तांदूळ पुरवूच असा दिलासा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिलाय.

Tags: