Belagavi

भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात उद्योजकांचा एल्गार

Share

औद्योगिक वीज बिलात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील उद्योजकांनी आज एल्गार पुकारला. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना दरवाढ मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

होय, बेळगावातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी, उद्योजकदेखील वीज दरवाढीमुळे त्रासले आहेत. हेस्कॉमने दुप्पट-तिप्पट वीजबिले पाठवण्याचा सपाट सुरु केल्याने संतापाचे वातावरण आहे. बेळगावातील उद्यमबाग आणि अन्य ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनाही अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आल्याच्या निषेधार्थ बेळगावातील उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली लघुउद्योजक संघटना, फौंड्री क्लस्टर, इन्स्टिटयूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन, हॉटेल मालक संघटना आदी विविध संघटनांच्या सदस्यांनी बेळगाव शहरात भव्य मोर्चा काढून सरकारचे याकडे लक्ष वेधले.
बेळगावातील चन्नम्मा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. त्याठिकाणी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव फाऊंड्री क्लस्टरचे अध्यक्ष राम भंडारे म्हणाले की, बेळगावातील सर्वच उद्योग आधीच अडचणीत आले असून सरकारने वीज दरात वाढ केल्यास आणखी समस्या निर्माण होणार आहे. 30 ते 40 टक्के उद्योगांचे महाराष्ट्रात स्थलांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही मंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी याप्रश्नी लक्ष घालून वीज दरवाढ त्वरित मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारने दरवाढ मागे घेतली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा व न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला.

रोहन जुवळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, वीज दरवाढ मागे घेण्यासाठी आम्ही सरकारला एक आठवड्याची मुदत देत आहोत, वीज बिलातील वाढ आठवडाभरात मागे न घेतल्यास कर्नाटक राज्यातील सर्व उद्योग बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. सरकारने असे केल्यास यास प्रतिसाद न दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. बेळगावातील सर्व व्यापारी, उद्योजक, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, लघुउद्योग संघटना आणि अन्य संघटनांचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, आज सायंकाळी 5 वाजता राज्यातील चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व जिल्हानिहाय पदाधिकारी वीज दरवाढीच्या मुद्द्यावर ऑनलाईन बैठक घेऊन चर्चा करणार आहेत असे यावेळी त्यांनी सांगितले.

रोहन जुवळी, डॉक्टर राजशेखर आनंद देसाई, राम भंडारे, महादेव चौगुले, दयानंद नेतलकर यांच्यासह चेंबर आणि अन्य संघटनांचे पदाधिकारी सदस्यांनी या मोर्चात सहभाग घेतला.

Tags: