चिक्कोडी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी महिलांनी नगरपालिकेसमोर हातात रिकाम्या घागरी घेऊन ठिय्या आंदोलन केले. महिनाभरात पुरेसा पाणीपुरवठा न केल्यास चिक्कोडी बंद करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

चिक्कोडी नगरपालिकेसमोर महिला व काँग्रेस सदस्यांनी आंदोलन केले. यावेळी ग्रेड टू तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या महिनाभरापासून चिक्कोडी शहरातील सर्व वार्डात दर आठ दिवसांनी पाणी येत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून देऊनही उपयोग झालेला नाही. शहरातील नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महिलांनी डोक्यावर रिकाम्या घागरी घेवून प्रांताधिकारी माधव गीते यांनी आंदोलनस्थळी यावे, असा आग्रह धरला. परंतु प्रांताधिकारी बाहेरगावी असल्याने ग्रेड टू तहसीलदार प्रमिला देशपांडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी महिलांनी प्रमिला देशपांडे व नगरपालिकेला खडसावले. यावेळी अधिकाऱ्यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महिनाभराचा अवधी मागितल्यानंतर तसेच नाले सफाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी नगरपरिषद सदस्य साबीर जमादार म्हणाले की, चिक्कोडी शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत बैठकीत अनेकदा बोलूनही काही उपयोग झाला नाही. केवळ काही उच्चभ्रूंच्या वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करणे चुकीचे आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

ज्येष्ठ नगरसेवक रामा माने, गुलाब हुसेन बागवान यांनी सांगितले की, चिक्कोडी शहराला गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत आहे.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी महांतेश निडवाणी म्हणाले की, चिक्कोडी शहराला सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. मोटरची समस्या व पाईपलाईनची समस्या यामुळे ही समस्या आणखी तीव्र झाली आहे. ही समस्या दूर करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी इरफान बेपारी, मुदसर जमादार, अनिल माने, रवी हंपन्नवर, खादर कमते, बाबू सम्मतशेट्टी, फिरोज कलावंत, आशिफ शिरगावकर, राजू बाळप्पागोळ, वर्धमान सदलगे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments