Accident

तीन ट्रेनच्या अपघाताने हादरलं ओडिशा, 235 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

Share

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी तीन रेल्वे ट्रेन्सची एकमेकांना धडक झाली. येथे बहनागा स्टेशनजवळ SMVB-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. प्रथम हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडलला धडकली. या अपघातात 235 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस पश्चिम बंगालमधील कोलकातामधील हावडा स्टेशन आणि तामिळनाडूमधील चेन्नई दरम्यान धावते. अपघात झाला तेव्हा रेल्वेत असणाऱ्या प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.


एका झटक्यात ट्रेन रुळावरून घसरली आणि गोंधळ झाला. ट्रेनचे डब्बे उलटल्यानं अनेक प्रवासी आत अडकले होते. त्यांची सुटका करण्यात अडचण येत आहे. दरम्यान, बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली असून सध्या बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
ट्रेन क्रमांक 12841 कोरोमंडल एक्सप्रेस शालीमार (पश्चिम बंगाल) रेल्वे स्थानकावरून चेन्नई सेंट्रलपर्यंत प्रवास करते. ही ट्रेन 25 तासांत 1659 किलोमीटर अंतर कापते. शुक्रवारी, कोरोमंडल एक्सप्रेसनं शालिमार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून 10 मिनिटं उशीर केला. काही मिनिटांनी ट्रेननं उशीर झालेला वेळ कव्हर केला. मात्र त्यानंतर साधारण 253 किमी अंतरावरील बहंगा बाजार स्थानकाजवळ काळानं घाला घातला आणि ट्रेनचा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण 15 रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. यातील 7 डब्बे उलटले असून रेल्वे रुळ तुटल्यानं 4 डब्बे बाहेर आले आहेत. या अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला.
रेल्वेनं एका निवेदनात म्हटलं आहे की, ट्रेन क्रमांक 12841 चेन्नई सेंट्रलहून शालीमारला जात होती. 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ही गाडी शालिमारकडे रवाना झाली होती. खरगपूर विभागांतर्गत बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रात्री 8.30 वाजता रेल्वे रुळावरुन घसरली. अप आणि डाऊन दोन्ही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.


अपघात नेमका झाला कसा?
बहनागा स्टेशनजवळ SMVB-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. प्रथम हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडलला धडकली.
हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र काही क्षणांतच या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी मालगाडी धडकली, आणि मग मृत्यूचं तांडवच सुरू झालं. यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनच्या चालकाला जवळच घडलेल्या अपघाताबाबत माहित नसावं. म्हणून त्याची ट्रेन पूर्ण वेगात होती. आणि हीच ट्रेन घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली.

Tags: