Belagavi

आनंद नगर वडगाव भागात नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Share

बेळगावातील दुसरा क्रॉस आनंद नगर वडगाव या ठिकाणी नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


होय, गेल्या आठ दिवसापासून आनंद नगर दुसरा क्रॉस येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. हे पाणी आजूबाजूच्या घरातील विहिरींमध्ये झिरपत असून विहिरींचे पाणी सुद्धा दूषित झाले आहे. त्यामुळे वापरायचे पाणी कुठून आणायचे हा प्रश्न येथील रहिवाशांसमोर उभा राहिला आहे. अनेक ठिकाणी गटारीला लागूनच सार्वजनिक नळ आहेत. या नळांना चाव्या नसल्यामुळे ड्रेनेजचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचून या नळातून मेन पाईपलाईनमध्ये हे ड्रेनेज पाणी शिरत असून हेच पाणी साई कॉलनीकडे व आनंदनगर दुसऱ्या क्रॉसकडे जात आहे. त्यामुळे हेच पाणी प्याल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांना हिवताप, डेंग्यू, मलेरिया, संडास, उलटी यासारखे आजार होत आहेत. अनेकदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा ड्रेनेजचे पाणी बंद करण्यात आलेले नाही. ड्रेनेजचे पाणी उघड्या गटारीतून वाहत आहे. अनेक ठिकाणी हे ड्रेनेजचे पाणी खड्ड्यामध्ये साचून असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. हेच डास नागरिकांना चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना संडास उलटीची बाधा झाल्याची येथील रहिवाशांची तक्रार आहे , अनेकांना डासामुळे डेंग्यू, मलेरिया, हिवताप सारखे आजार उद्भवत आहेत. तेव्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देऊन हे ड्रेनेज मिश्रित पाणी थांबवावे अशी येथील नागरिकांची मागणी होत आहे.


आनंद नगर दुसऱ्या क्रॉस च्या नागरिकांनी वारंवार या ड्रेनेज पाण्याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता करूया, बघूया, करूया अशी उडवाउडवीची उत्तरे ते देत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे

दरम्यान, वडगाव स्मशानभूमीजवळील ड्रेनेजच्या चेंबर मधून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी आनंदनगर तिसऱ्या क्रॉसहुन दुसऱ्या क्रॉसकडे गटारीतून वाहत आहे, या ड्रेनेज मिश्रित पाण्यामुळे आजूबाजूच्या घरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे, त्याचबरोबर अनेक ठिकाणी नळाच्या पाईपलाईन मध्ये हे ड्रेनेज मिश्रित पाणी मिसळत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी याकडे लक्ष देऊन तत्काळ नागरिकांची ही समस्या दूर करावी अशी येथील नागरिकांकडुन मागणी होत आहे.

Tags: