Belagavi

कन्नडसक्ती विरोधातील हुतात्म्यांना बेळगावात विनम्र अभिवादन

Share

संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्तीच्या निषेधार्थ जून १९८६मध्ये पुकारलेल्या आंदोलनात पोलीस गोळीबारात प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना बेळगावात आज विनम्र अभिवादन करण्यात आले. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात ३७व्या हुतात्मादिनी हुतात्म्यांच्या बलिदानाचे कृतज्ञतापूर्ण स्मरण करून नव्या जोमाने सीमाप्रश्नाचा लढा लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ आणि तो महाराष्ट्रात सामील करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेला लढा दडपण्यासाठी ३७ वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारने सीमाभागात कन्नडसक्ती लागू केली. १९८६ च्या जून महिन्यात याच्या निषेधार्थ सीमाभागात लोकशाहीपुर्ण मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंडलगा व अन्य काही ठिकाणी कर्नाटक पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात एका बालिकेसह ८ मराठी बांधवांचा मृत्यू झाला. या ८ हुतात्म्यांना दरवर्षी हिंडलगा येथे आदरांजली वाहून अभिवादन करण्यात येते. त्यानुसार आज या ८ हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार, पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. चंदगडचे आमदार राजेश पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर आदींच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अमर रहे, अमर रहे, हुतात्मा अमर रहे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत समिती कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.


यावेळी बोलताना चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील म्हणाले की, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून मी या हुतात्मा दिन कार्यक्रमाला उपस्थित आहे. सीमावासीय, सीमाभाग आणि चंदगड तालुक्याचे अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. माझे वडील माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी सीमाप्रश्नासाठी दिलेले योगदान सगळ्यांच्या स्मरणात आहे. शरद पवार यांनी या प्रश्नासाठी सर्वांची एकजूट करून लढा दिला. यावेळी सीमाभागातील पाचपैकी किमान दोन-तीन जागा महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळण्याची अपेक्षा होती. दुर्दैवाने तसे झाले नाही. परंतु यामुळे सीमावासियांनी उमेद खचू न देता, पूर्वीच्याच ताकदीने लढा द्यावा. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात महाराष्ट्राची, सीमावासियांची बाजू समर्थपणे मांडण्यासाठी चांगले वकील देऊन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सर्व मंत्री, आमदार व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून सीमावासीयांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय मिळवून देईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी, कन्नडसक्ती विरोधातील आंदोलनाची माहिती देऊन सांगितले की, या आंदोलनात शरद पवार यांना धक्काबुक्की झाल्याचे वृत्त पसरल्याने हिंडलगा भागात लोकांचा उद्रेक झाला. त्यावेळी कर्नाटकी पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात ८ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. या घटनेला ३७ वर्षे उलटली तरीही अद्याप कन्नडसक्ती दूर झालेली नाही किंवा सीमाप्रश्न सुटलेला नाही. महाराष्ट्र व केंद्र सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही ही खेदाची बाब आहे. आता तर कर्नाटक सरकार मराठी सीमाभागातील ग्राम पंचायतींचे मराठी रेकॉर्ड रद्द करून कन्नडमध्ये रेकॉर्ड तयार करत आहे. परंतु आम्ही धीर न सोडता कन्नडसक्तीच्या विरोधात आर या पारची रस्त्यावरची लढाई लढू. त्यासाठी आपण सारेजण कटिबद्ध होऊया असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी हिंडलगा हुतात्मा स्मारक विकासासाठी कोंडुसकर परिवारातर्फे एक लाख रुपये देणगीचा धनादेश चंद्रकांत कोंडुसकर यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्याकडे सुपूर्द केला.
प्रारंभी आमदार राजेश पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, प्रकाश मरगाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, आर. एम. चौगुले, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील आदींच्याहस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र व पुष्पहार घालून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी एम जी पाटील, मुरलीधर पाटील, अमर येळ्ळूरकर, आर आय पाटील, शुभम शेळके, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, नेताजी जाधव, मनोज पावशे, दत्ता जाधव, मदन बामणे, विकास कलघटगी, कृष्णा हुंदरे, डी बी मोहनगेकर, राजूकर, धनराज गवळी, सुरेह अगसगेकर, मनोहर शिंदे, डी बी पाटील, महादेव मंगनाकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: