Accident

विजापूर जिल्ह्यात भीषण अपघातात सासू, जावई जागीच ठार : दोन मुलांची प्रकृती चिंताजनक

Share

भरधाव वाहनाने दोन दुचाकींना धडक दिल्याने एका दुचाकीवरील सासू व जावई जागीच ठार झाले, तर दोन मुले मृत्यूशी लढा देत असून दुसऱ्या दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक दुर्घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहराबाहेरील तंगडगी राज्य महामार्गावर घडली.


दोन्ही मृतांच्या शरीरातील मांस व अवयव रस्त्यावर विखुरले गेल्याने अपघाताची भीषणता अधोरेखित झाली. मृत हा महामार्गालगत असलेल्या मुदनाळा गावातील होता
55 वर्षीय शरणम्मा कांबळी आणि त्यांचा जावई 35 वर्षीय नागेश शिवापुर अशी मृतांची नावे आहेत. 10 वर्षीय कृतिका आणि 8 वर्षीय भूमिका या मृत नागेशच्या मुली अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुद्देबिहाळ येथील मुथ्थुट फायनान्स येथे काम करणारा सुधीर बेनाळ असे दुसऱ्या जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. या सर्व जखमींवर स्थानिक शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

शहरातील जुन्या तहसीलदार कार्यालयासमोरील मिनी भाजीपाला मार्केटमध्ये सासू आणि जावई दोघेही भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. रात्री व्यवसाय आटोपून ते आपल्या मुलांसह गावी परत जात असताना ही दुर्घटना घडली. अवघे एक किमी अंतर कापले असते तर तो सुखरूप घरी पोहोचला असता. पण काळ बनून आलेल्या ट्रकनं सासूचा जीव तर घेतलाच पण वडिलांवरही घाला घालून दोन कोवळ्या मुलींनाही अनाथ केले, अशी चर्चा दुर्घटनेनंतर जमलेल्या जमावात सुरु होती. अपघातानंतर चालकाने ट्रकसह पलायन केले होते. मात्र अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवून नेबगेरी गावाजवळ चालकासह ट्रक ताब्यात घेतला. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेहांचे छिन्नविछिन्न भाग पिशव्यांमध्ये भरून शवविच्छेदनासाठी नेले. याप्रकरणी मुद्देबिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते.

Tags: