गेल्या 2 आमदारकीच्या काळात मी केलेल्या विकासकामांचे कौतुक करून जनतेने मला आशीर्वाद दिले आहेत असे निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले.

चिक्कोडी शहरातील खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. माझ्या तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक आहे. गेल्या 2 वेळा मी केलेल्या विकासकामांसाठी जनतेने मला आशीर्वाद दिले आहेत. हालसिद्धनाथ साखर कारखाना आणि जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून 3 हजार युवकांना रोजगार दिले आहेत. निपाणी मतदारसंघात केंद्र सरकारचे नवीन प्रकल्प आणून या क्षेत्राचा अधिक विकास करू. दीड कोटी रुपये खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, विज्ञान केंद्र, हायटेक लायब्ररीचे बांधकाम या स्मारकात करण्यात येणार असून तीन कोटी 10 लाख रुपये खर्चून तालुका स्टेडियम, जलतरण तलाव बांधण्यात येणार असून, मिनी विधानसभेच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या पराभवाबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की, या पराभवाचे आत्मपरीक्षण करण्यात येत आहे. त्यात झालेल्या चुकांबाबत चर्चा सुरु आहे. काही ठिकाणी आमचे उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाले आहेत. यावर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा केली जाईल, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसमधील लिंगायत मुख्यमंत्र्यांवर भाष्य करताना, लिंगायतांनी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाची मागणी करायला हवी होती, पण तो काँग्रेस पक्षाचा विषय आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments