वडील उमेश कत्ती यांच्या आशीर्वादाने आणि काका रमेश कत्ती यांच्या मार्गदर्शनामुळे आपला विजय झाल्याची प्रतिक्रिया हुक्केरी मतदार संघातील भाजप उमेदवार निखिल कत्ती यांनी व्यक्त केली आहे.

आरपीडी कॉलेजमधील मतदान केंद्रात पार पडलेल्या मतमोजणीत हुक्केरी मतदारसंघात निखिल कत्ती यांनी विजय मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निखिल कत्ती यांनी प्रथमच आमदार म्हणून विधानसौधच्या पायऱ्या चढणार असल्याचा आनंद व्यक्त केला. वडिलांचे आशीर्वाद आणि काका माजी खासदार रमेश कत्ती यांच्या मार्गदर्शनामुळे आपला विजय शक्य झाला असे ते म्हणाले. आमदार म्हणून वडिलांची राहिलेली विकासकामे करणार आहे. हुक्केरी औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणणे, हिडकल धरण परिसराचा विकास करणे याला आपले प्राधान्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले. चिक्कोडी-सदलगा मतदार संघात काका रमेश कत्ती यांचा पराभव झाल्याबाबत प्रतिक्रिया देताना तेथे प्रकाश हुक्केरी हे मोठे प्रस्थ आहे, पक्षादेशानुसार आम्ही प्रयत्न केले. पण निवडणुकीत हार-जीत असतेच असे निखिल कत्ती म्हणाले.
18 व्या फेरीअखेर भाजपचे निखिल कत्ती यांनी 36261 मतांची आघाडी मिळवली. त्यांना 90339 मते मिळाली होती. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार माजी मंत्री ए. बी. पाटील यांना 54078 मते मिळाली होती.
एकंदर बेळगाव जिल्ह्यातील सर्वात तरुण आमदार बनलेल्या निखिल कत्ती यांना याबाबतचा आनंद लपवता आला नाही हे यावेळी दिसून आले.


Recent Comments