एक्झिट पोलचे सगळेच निष्कर्ष खरे ठरतात असे नाही. भाजप सत्तेत येणार नाही असे सर्व्हे, पोलचे निष्कर्ष यापूर्वीही अनेक राज्यांच्या निवडणुकीवेळी आले. पण ते खोटे ठरून भाजपनेच सत्ता मिळवली. कर्नाटकातही याचीच पुनरावृत्ती होऊन भाजप सत्तेत येईल असा आशावाद मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प यांनी व्यक्त केलाय.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प म्हणाले की, कर्नाटकातील जनता शहाणी आहे. डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास चांगला होईल हे जनता जाणते. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवूनच जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलाय याची खात्री आहे.
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सरकार सत्तेवर आल्यास मंत्रिपदासाठी प्रयत्न करणार का या प्रश्नावर मी कधीही कोणत्याही पदासाठी लॉबिंग केले नाही असे त्यांनी सांगितले. मी सामान्य कार्यकर्ता आहे, आजवर पक्षाने, वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत.
बोम्मई असोत किंवा जोशी, येडियुरप्पा, कै. अनंतकुमार अशा सर्व नेत्यांशी माझे चांगले संबंध होते व आहेत. बोम्मई यांनी तर मला दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी दिली होती. अक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्याने मी आजवर दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत असे ते म्हणाले.
शेट्टर ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षत्यागाने सगळ्यांनाच दुःख झाले आहे. राजकारणात कोण जिंकले, हरले याने फरक पडत नाही. सर्व काही ठीक होईल असेही मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प यांनी यावेळी सांगितले.


Recent Comments