Belagavi

कडेकोट बंदोबस्तात उद्या होणार मतमोजणी; विजयोत्सव, मिरवणूक, मद्यविक्री बंद

Share

राज्यातील सर्वात मोठे मतमोजणी केंद्र असलेल्या बेळगावातील आरपीडी महाविद्यालयात उद्या होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मोजणी केंद्रावर तैनात निवडणूक कर्मचाऱ्यांना आज दुसऱ्या टप्प्यातील मोजणी प्रशिक्षण देण्यात आले.


मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी आज पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, एसपी डॉ. संजीव पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरपीडी कॉलेजमधील मतमोजणी केंद्राला भेट देऊन मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला. मतमोजणीसाठी मांडलेली टेबले, मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम्स, तेथील सुविधा तपासून एकंदर तयारीचा त्यांनी घेतला. फ्लो

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, एकूण 18 विधानसभा मतदार संघांची मतमोजणी होणारे बेळगावातील आरपीडी महाविद्यालय हे राज्यातील सर्वात मोठे मतमोजणी केंद्र आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना आज मतमोजणीची दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण 1198 निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर सुरक्षेसाठी निमलष्करी दल, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल, नागरी पोलीस अशा 1500 सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले आहेत. उद्या सकाळी 6 वाजता निवडणूक कर्मचारी मतमोजणीच्या कामावर दाखल होतील. 7.30 वाजता स्ट्रॉंग रूम्स उघडून मतपेट्या बाहेर काढण्यात येतील. बरोबर 8 वाजता मतमोजणीला सुरवात करण्यात येईल. 8 वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या पोस्टल बॅलटस स्वीकारून त्यांची आधी मोजणी करण्यात येईल. त्यासाठी 2 टेबल्स मांडण्यात येतील. त्यानंतर 8.30 ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु करण्यात येईल. त्यासाठी 11 टेबल्स मांडण्यात येतील. प्रत्येक टेबलवर मतमोजणीची 20 ते 22 राऊंड्स होतील. बेळगाव ग्रामीणचे सर्वाधिक 29 राऊंड्स होतील. प्रत्येक अर्ध्या तासानंतर झालेल्या राऊंड्सचा तपशील प्रसारमाध्यमांची घोषित करण्याची व्यवस्था केंद्रावर केली आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व 18 मतदारसंघातील निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. एकंदर उद्याच्या मतमोजणीसाठी बेळगाव जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मतमोजणीवेळच्या बंदोबस्ताची माहिती देताना शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या म्हणाले की, आरपीडी कॉलेज मतमोजणी केंद्रात एकूण 6 इमारतींमध्ये मतमोजणीची व्यवस्था केली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. त्यात सर्वात आधी स्ट्रॉंग रूम्स आणि मोजणी स्थळी सशस्त्र सुरक्षा बल, केंद्र परिसरात राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्राबाहेर सीएआर आणि सिव्हिल पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सर्वत्र सीसीटीव्ही, अग्निशम यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघातील उमेदवार, त्यांचे कॉऊंटिंग एजंट्स मिळून 4 ते 5 हजार लोक केंद्रात येण्याची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने जिल्हा पोलिसांच्या समन्वयाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उद्या पहाटे बरोबर 5 वाजता सर्व पोलीस सेवेत दाखल होतील. रोल कॉल नंतर ते नियुक्त ठिकाणी हजर होतील. मतदान केंद्र परिसरात ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी ट्रॅफिक ऍडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. याशिवाय शहरात आवश्यक त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केले आहे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले की, मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलिसांतर्फे सुयोग्य नियोजन केले आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि अन्य गैरकृत्यांत सहभागी असणाऱ्यांवर स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मतमोजणी काळात अनुचित प्रकार टाळण्याकरिता आज सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी कलम 144 जारी करून जमावबंदी केली आहे. मिरवणुका काढणे, निदर्शने आदी कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मतदानादिवशीप्रमाणेच मतमोजणीसुद्धा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर बेळगावात मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलानेही कंबर कसली आहे.

Tags: