बेळगाव ग्रामीणमधील काँग्रेस उमेदवार आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या कुटुंबासह विजयनगर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी त्यांनी ग्रामीणमधून नक्की निवडून येण्याचा आणि मंत्री होण्याचा विश्वास व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीसाठी हिंडलगाजवळील विजयनगर सरकारी मराठी शाळेतील मतदान केंद्रात आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, पुत्र मृणाल हेब्बाळकर आणि आईसमवेत विजयनगरच्या शाळेतील मतदान केंद्रात पोहोचून आ. हेब्बाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. हेब्बाळकर यांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. विनायकाची पूजा करून वडीलधारे, आई आणि मतदारांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवत आहे. लोकशाहीने दिलेला पवित्र हक्क बजावत आज मतदान केले आहे. गेल्यावेळी काहीसा तणाव होता, मात्र आता आत्मविश्वासाने निवडणूक लढवत आहे.
गेल्यावेळपेक्षा यावेळी किमान एका अधिक मताने विजयी होईन, रिंगणात असलेले सर्वच उमेदवार आपले प्रतिस्पर्धी आहेत, राज्यात काँग्रेसला पूरक वातावरण आहे. जनता यावेळी नक्कीच काँग्रेसला आशीर्वाद देऊन सत्तेत आणेल. मी मंत्री होणे हे पक्षश्रेष्ठींच्यावर अवलंबून आहे, पण सरकार आले तर निश्चित मंत्री होईन असा ठाम विश्वास आ. हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.


Recent Comments