विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव शहरासह जिल्ह्यात मतदानाला आज सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रारंभ झाला. अनेक ठिकाणी संथगतीने मतदान होत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागातील मतदान केंद्रांवर कुटुंबियांसमवेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. बेळगाव जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. बेळगाव शहरात बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघातील चुरशीच्या कढती होत आहेत. सर्वत्र आज सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात मतदानाला संथ प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाने म्हणावी तशी गती घेतलेली नव्हती.
मतदान केंद्रांच्या परिसरात, दोनशे मीटर लांब अंतरांवर राजकीय पक्षांनी मतदारांना मतदान केंद्र, मतदान यादीतील क्रमांक आदी तपशील देणाऱ्या चिठ्ठ्या देण्यासाठी टेबले लावली आहेत. या टेबलांवर मतदारांची नावे विचारून तपशिलाच्या चिठ्ठ्या देण्यात येत होत्या. याठिकाणी राजकीय पक्षांचे ध्वज, चिन्हे, फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदान कक्षाबाहेर रायफलधारी निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांची फिरती पथके गस्त घालत आहेत.


Recent Comments