बेळगावात डबल इंजिनचे सरकार येणार असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामेच श्रीरक्षा होईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शाहुनगर येथे झालेल्या निवडणूक प्रचार सभेत व्यक्त केला.


बेळगाव उत्तरमध्ये डॉ. रवी पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन, उपमहापौर रेश्मा पाटील, भाजप नेते किरण जाधव आदी उपस्थित होते.
बेळगाव येथील सदाशिव नगर शेवटच्या बस स्टॉप परिसरात डॉ. रवी पाटील यांनी समर्थकांसह प्रचार केला. या भागातील भारतीय जनता पक्षाच्या चाहत्यांनी आणि सामान्य जनतेने देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर डॉ. रवी पाटील यांनी बेळगाव येथील गांधी नगर येथील फळ व फुल मार्केटमध्ये प्रचार केला. फुल व फळ मार्केटच्या सर्वांगीण विकासासाठी योजना राबविण्याचे आश्वासन देऊन त्यांना मतदान करण्याची विनंती केली.
तसेच काल सायंकाळी शहरातील चव्हाटगल्ली येथे झालेल्या प्रचार सभेत डॉ.रवि पाटील यांना विजयी करण्यासाठी हिंदुत्वासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी भारतीय जनता पक्षाला आपण सर्वांनी पूर्ण पाठिंबा देऊ असा निर्धार करण्यात आला.
या भागात प्रचारावेळी डॉ. रवी पाटील व त्यांच्या समर्थकांचे महिलांनी आरती करून स्वागत केले. तसेच युवक मंडळ कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी खडक गल्लीतील मरगाई मंदिरातून मरगाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्या भागात प्रचार केला.


Recent Comments