विकासाचे प्रणेते आ. अभय पाटील यांना पुन्हा एकदा बेळगाव दक्षिणमधून प्रचंड मतांनी निवडून देऊ असा निर्धार करत हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. वडगाव, शहापूर परिसरात सळसळत्या उत्साहात भव्य प्रचारफेरी काढून महिलांनी अभय पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

होय, बेळगाव शहराच्या दक्षिणेकडील रस्त्यावर नजर जाईल तिथपर्यंत महिलांच्या झुंडीच्या झुंडी दिसून आल्या. जाहीर प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी हातात भाजपचा झेंडा धरून हजारो महिलांनी अभय पाटील यांच्यावतीने त्यांच्या समर्थनार्थ फेरी काढून मतयाचना केली.
महिलांची ही भव्य रॅली वडगाव जेल शाळा येथून सुरु झाली. त्यानंतर वडगाव मेन रोडवरून शहापूर पोलीस ठाणे, नाथ पै सर्कल, शहापूर परिसरात फिरून खडेबाजार मार्गे शिवाजी उद्यानाजवळील शिवचरित्र येथे समाप्त झाली.
दरम्यान, प्रचारात सहभागी झालेल्या महिलांनी इन न्यूज आपली मराठी सोबत बोलताना सांगितले की, अभय पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली असून शहराच्या सुशोभिकरणात त्यांचे योगदान आहे. त्यामुळे यावेळीही आमचे मत अभय पाटील यांनाच देणार आहे.
मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणींना धावून जात त्यांनी मदत केली आहे. कोरोना काळात लसीकरण, औषधांचे वाटप, गोरगरिबांना व गरजूना जेवण, वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. महिलांना गृहोद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन, मदत देऊन स्वावलंबी केले आहे. लोकप्रतिनिधी असल्याचा रुबाब न दाखवता साधा कार्यकर्त्याप्रमाणे जनतेत मिळून मिसळून ते राहतात. प्रचंड विकासकामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे आम्ही स्वयंप्रेरणेने त्यांच्या प्रचारात सहभागी झालो असून त्यांनाच निवडून देणार आहोत असे या महिलांनी सांगितले.
बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनीही यावेळी भाजपला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.
यावेळी बोलताना आ. अभय पाटील यांनी, निवडणुकीला आणखी दोन दिवस बाकी आहेत, सर्वांनी मतदानाच्या दिवशी 10 मे रोजी सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर जाऊन भाजपला मतदान करण्याची विनंती केली.
दरम्यान, बेळगाव दक्षिण मतदार संघातील विविध भागातील येळ्ळूरसह विविध खेड्यातील हजारो महिलांनी सळसळत्या उत्साहाने अभय पाटील यांच्या प्रचारात भाग घेतला.


Recent Comments