बेळगाव तालुक्यातील चलवेनट्टी येथे ग्राम देवता श्री ब्रम्हलिंग मंदिराची वास्तूशांति, मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण व उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साह आणि भक्तिभावाने पार पडला. यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
पूज्य श्री शिवसिद्धसोमेश्वर महास्वामिजी मुक्तिमठ, पूज्य श्री गुरुबसवलिंग महास्वामिजी कडोली यांचे सानिध्य व मार्गदर्शनाखाली आणि पुरोहित भुषण जोशी व सहकाऱ्यांच्या मंत्रघोषात चलवेनट्टी येथे श्री ब्रम्हलिंग मंदिराची वास्तूशांति सोहळा पार पडला. चलवेनट्टीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत सतत पाच दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक, संगीत भजन, हरिपाठ, प्रवचन, व्याख्यान व हिंदुत्व जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘हरहर महादेव’, ‘ब्रह्मलिंग देवाच्या नावाने चांगभल’ अशा जयघोषात फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात, जल्लोशी वातावरणात, अत्यंत श्रद्धाभक्ती आणि उत्साहात हा सोहळा संपन्न झाला.
मंदिर परिसराची साफसफाई करून भव्य मंडप उभारून मंदिर सजवून हार व फुलांसह देवाची अत्यंत आकर्षक आरास करण्यात आली. भगवे झेंडे व आकर्षक विद्युत रोषणाई आणि स्वागत कमान उभारून संपुर्ण गावच सजवण्यात आले होते. प्रत्येक कार्यक्रमाचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रण करुन स्क्रीन पडद्यावर लाइव्ह प्रक्षेपणही करण्यात आले. देवस्थान जीर्णोद्धार कमिटी सर्व पदाधिकारी, युवक, महिला मंडळासह सर्व संघ संस्था, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, माहेरवाशीनी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची उपस्थिती या सोहळ्याला होती. पहिल्या दिवशी कलावती आईचे भक्त मनोहर पाटील व शांताराम अलगोंडी यांच्या हस्ते पुजनाने कळस मिरवणुकीला चालना दिल्यानंतर गावभर ढोल ताशांच्या गजरात जयघोषासह गुलाल उधळत जल्लोशी वातावरणात भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी मुक्तीमठाचे पूज्य श्री शिवसिद्धसोमेश्वर महास्वामिजी यांचे मार्गदर्शन आणि भुषण जोशी व सहकारी यांच्या मंत्रघोषात सनई चौघड्यांच्या गजरात देवाचा आगर होम करण्यात आला. जीवन विद्या मिशन तर्फे श्री शंकर बांदकर(सिंधुदूर्ग देवगड) यांच्यातर्फे ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ यावर प्रवचन झाले. नंतर रात्री ९ ते १० यावेळेत हिरामनी मुचंडीकर यांचे हिंदुत्व जागृतीवर व्याख्यान झाले.
तिसऱ्या दिवशी गोमाता पुजन, वास्तूशांति व देवाची जुन्या मंदिरातून नूतन मंदिरात सहवाद्य मिरवणुकीने स्थलांतर तसेच होम हवन, वास्तूशांती व सत्यनारायण यजमान सौ व श्री अशोक पाटील दांपत्याच्या हस्ते झाली. कल्मेश्वर महिला हरिपाठ मंडळ, कालकुंद्री यांचे भजन, रात्री ‘जीवन सुंदर आहे’ यावर गणेश शिंदे (पुणे) यांचे व्याख्यान तसेच रात्री ११ वा. सर्व भजनी मंडळे चलवेनट्टी यांचे जागर भजन सेवा झाली.
चौथ्या दिवशी कडोलीचे पूज्य गुरुबसवलिंग स्वामीजी यांच्या सानिध्य व मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख पाहुणे क्लासवन गव्ह. कॉन्ट्रॅक्टर एन.एस.चौगुले (मण्णुर) यांच्या हस्ते मुख्य कळस तर पूर्वेकडील कळस जोतिबा बडवाण्णाचे, पश्चिमेकडील कळस निवृत्त सैनिक राहुल पाटील, दक्षिणेकडील कळस डॉ. युवराज पाटील व उत्तरेकडील कळस पुजन किरण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. दुपारी माऊली महिला हरिपाठ मंडळ, अतिवाड यांचे भजन तर रात्री आदिनाथ डवरी, मेतके (ता.कागल) यांचे नाथपंथी जागर भजन झाले.
पाचव्या दिवशी सौ व श्री अशोक पाटील यांच्यातर्फे सत्यनारायण पूजा तर मंदिर कमिटी उप खजिनदार व माजी ग्रा.पं. सदस्य मारुती पाटील व रुचिरा स्नॅक्स पाईंटचे मालक नारायण पाटील यांच्या हस्ते फित कापून आणि माजी एसडीएसमसी अध्यक्ष लक्ष्मण बडवाण्णाचे व माजी ग्रा.पं. सदस्य बाबु पाटील यांच्या हस्ते फित कापून व गाभाऱ्याचे पुजन करुन मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यासंदर्भात मंदिर समितीच्या उपाध्यक्षा नंदा यांनी माहिती दिली.
नंतर सतत पाच दिवस सकाळच्या नाष्ट्यापासुन दुपारी व रात्री स्वखर्चातुन प्रसादाची व्यवस्था करणारे निवृत्त सैनिक अर्जुन बडवाण्णाचे व भरमा पाटील यांच्याहस्ते फित कापून महाप्रसादाला चालना देण्यात आली.
नंतर मंदिर उभारणीपासुन ते लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला सहकार्य केलेल्या सर्वांचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर एन. एस. चौगुले, सुनिल पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर बेळगाव, संजय पाटील, श्री क्षेत्र धर्मस्थळ योजनाधिकारी नागराज एच, परशराम बडवाण्णाचे, कृष्णा पाटील, मंजुनाथ ठोसर, भरमाण्णा पाटील, मल्लाप्पा हुंदरे, चंद्रकांत पाटील, इराप्पा कलखांबकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लाप्पा बडवाण्णाचे होते. सुत्रसंचालन मनोहर हुंदरे, प्रास्ताविक लक्ष्मण बडवाण्णाचे यांनी केले. भरमा अलगोंडी यांनी आभार मानले.
Recent Comments