Belagavi

संधीसाधू भाजपला दूर सारून काँग्रेस, लक्ष्मी हेब्बाळकरांना विजयी करा : अशोक चव्हाण

Share

लोकांची दिशाभूल करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा खेळ भाजप जाणीवपूर्वक, विचारपूर्वक करत आहे. जाती-जातीत, धर्मांमध्ये भांडणे लावून राजकीय इप्सित साध्य करत आहे. अशा धूर्त, संधीसाधू भाजपला दूर सारून काँग्रेसला विजयी करा असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथे ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांची भव्य जाहीर प्रचारसभा झाली. या सभेला उद्देशून बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, आपल्या पक्षाचे सरकार नसूनही विकासासाठी मोठा निधी आणून ग्रामीण मतदारसंघाचा विकास करण्याची किमया आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे. कामाच्या बाबतीत आणि मतदारांच्या हाकेला धावून येणाऱ्या त्या वाघीण आहेत. चित्रा वाघसारख्या भाजप नेत्या ५ वर्षांतून एकदा येतील आणि परत जातील. परंतु आ. हेब्बाळकर तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असतील, तुमच्या अडचणीला नेहमी धावून येतील हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे. त्यामुळे येत्या १० तारखेला हाताच्या चिन्हापुढील बटन दाबून त्यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारमुळे देशात आणि राज्यात महागाई प्रचंड वाढली. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे असे सांगून कर्नाटकातील जनतेला दिलासा देण्यासाठी काँग्रेसने सर्व समाजांना नजरेसमोर ठेवून जाहीरनामा प्रकट केला आहे. पाच गॅरंटी कार्ड जाहीर केली आहेत. ही सर्व वचने सत्तेत येताच एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी काँग्रेसला आणि ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर याना निवडून देण्याचे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या आणि राज्यातील बोम्मई सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री बंटी उर्फ सतेज पाटील यांनीही भाजप सरकारवर टीका करून जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीला भाजपचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला. आ. हेब्बाळकर यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. आ. हेब्बाळकर यांनी राजहंस गडावर छत्रपती शिवरायांचा देशातील भव्य पुतळा उभारला. पण भाजप सरकारला एवढी घाई लागली की त्यांनी ८-१० लोकांच्या उपस्थितीत कामे अर्धवट असतानाच त्याचे उदघाटन उरकून घेतले. पण आ. हेब्बाळकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते शिवरायांच्या त्या पुतळ्याचे उदघाटन झाले ही खूप मोठी बाब आहे असे त्यांनी सांगितले.


यावेळी काँग्रेस नेते युवराज कदम, मृणाल हेब्बाळकर आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर नांदेडचे आ. अमर राजूरकर, शंभूराजे देसाई, बंटी शेळके, तौफिक मुलाणी, गोपाळराव पाटील, एम. जे. पाटील, यल्लाप्पा ढेकोळकर आदी उपस्थित होते. सभेला ग्रामीण मतदार संघातील गावोगावचे हजारो कार्यकर्ते, महिलावर्ग उपस्थित होता.

Tags: