काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष देशाचा आणि राज्याचा विकास करू शकत नाहीत. आतापर्यंत त्यांच्या आमदार, खासदारांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊन स्वतःचा विकास साधला आहे असा आरोप करून या दोन्ही पक्षांना बाजूला सारून राष्ट्रीय समाज पक्षाला ताकद देण्याचे आवाहन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.

गुरुवारी कागवाडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे कागवाड मतदारसंघाचे उमेदवार सतीश सनदी यांच्या प्रचारासाठी आलेल्या महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या दोन्ही पक्षांकडून व्यवस्थेत कोणताही बदल होणार नाही. तामिळनाडूत प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे. ते राज्य क्रमांक १ वर आहे. त्या राज्याची आर्थिक व्यवस्था मजबूत आहे. केवळ जातींमध्ये वैमनस्य निर्माण करून जातीचे राजकारण करणे हाच भाजप व काँग्रेसचा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व लोकांच्या गळ्यातले ताईत आहेत याबाबतच्या प्रश्नावर, ते फक्त उच्चवर्णीयांच्या गळ्यातले ताईत आहेत. ते मोठी भाषणे करतात. अदानी, अंबानींच्या आर्थिक सुधारणांमुळे देशाचा विकास झाला म्हणावे का? मोदी काय अन राहुल गांधी काय, त्यांच्यामुळे देशाचा विकास होणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याबद्दल विचारले असता, शिवसेना पक्षाचे बाळासाहेब ठाकरे जसे अध्यक्ष झाले, त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे अध्यक्ष झाले, त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे अध्यक्षपदी असतील. हे कौटुंबिक राजकारण असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील विद्यमान सरकार दरबारी आमदारांच्या अपात्रतेची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. सरकार पडल्यास राष्ट्रवादीचे आमदार सत्तेसाठी आसुसले आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले की, 16 आमदार अपात्र ठरले तरी सरकारला कोणतीही अडचण येणार नाही.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ते कर्नाटक राज्यातील 9 जागांवर निवडणूक लढवत आहेत ज्यात कागवाड, बेळगाव आणि विजयपूरचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी पक्षाचे उमेदवार सतीश सनदी, राष्ट्रीय समन्वयक बाळकृष्ण लेंगरे उपस्थित होते.


Recent Comments