गद्दार फडणवीसचा धिक्कार असो, महाराष्ट्रद्रोही फडणवीसचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा देत बेळगावात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून तीव्र विरोध केला.

एकीकडे महाराष्ट्रात सामील होण्याच्या अमीट इच्छेने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील मराठी भाषिक गेली ६६ वर्षे प्राणपणाने लढा देत असताना बेळगावात समिती उमेदवाराच्या विरोधात भाजप उमेदवारासाठी प्रचार करण्यासाठी फडणवीस आज बेळगावात आले होते.
खडेबाजारातील टिळक चौकात भाजप उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सभा घेत होते. त्यावेळी कोनवाळ गल्ली भागातून अचानक प्रकटलेल्या समितीच्या नेते व कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. अंगात काळे टीशर्ट्स घालून हातात काळे झेंडे घेऊन सभेच्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत समिती कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. गद्दार फडणवीसचा धिक्कार असो, महाराष्ट्रद्रोही फडणवीसचा धिक्कार असो ५० खोके, एकदम ओके अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला क्षोभ व्यक्त केला.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणाही देण्यात आली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना मागे रेटत सभास्थळापासून दूर नेले. तरीही बापट गल्लीच्या कोपऱ्यावर उभे राहून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला.


Recent Comments