Belagavi

सह्याद्रीनगर महालक्ष्मी मंदिराचा वर्धापनदिन भक्तिभावाने

Share

बेळगावातील सह्याद्रीनगरातील श्री महालक्ष्मी मंदिराचा वर्धापनदिन भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

बेळगाव परिसरातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सह्याद्रीनगरातील श्री महालक्ष्मी मंदिराचा वर्धापनदिन भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महाअभिषेक, होमहवन, महामंगलारती आदी विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले. देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सह्याद्रीनगरसोबतच आसपासच्या उपनगरातील हजारो भाविकांनी मंदिरात जाऊन देवी महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेतले.

दरम्यान, या संदर्भात ‘आपली मराठी’ला माहिती देताना सह्याद्रीनगर श्री महालक्ष्मी सेवा अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष प्रा. हिरेमठ यांनी सांगितले की, सह्याद्रीनगरात श्री महालक्ष्मी मंदिराची स्थापना करून सुमारे वीस वर्षे झाली आहेत. पाच वर्षांपूर्वी नवीन मंदिर उभारण्यात आले आहे. त्यानिमित्त दरवर्षी मंदिराचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी, धार्मिक विधींनी साजरा करण्यात येतो. त्याला सह्याद्रीनगरसोबतच सारथीनगर, विद्यानगर, पोलीस कॉलनी, गणेशपूर आदी भागातील हजारो भाविकांची उपस्थिती असते. दरवर्षी यानिमित्त भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हजारो भाविक त्याचा लाभ घेतात. भाविकांची संख्या आणखी वाढावी अशी आमची अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महालक्ष्मी मंदिराच्या स्थापनादिनानिमित्त सकाळपासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. खासकरून विविध प्रकारचे पूजासाहित्य घेऊन आलेल्या महिला भक्तांची संख्या लक्षणीय होती. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचा सुमारे चार हजार भाविकांनी लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्रीनगर श्री महालक्ष्मी सेवा अभिवृद्धी संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी परीश्रम घेतले.

Tags: