कर्नाटकातील 40 % कमिशनच्या भ्रष्ट भाजप सरकारने राज्याची दीड लाख कोटी रुपयांची लूटमार केली आहे. अशा भ्रष्ट सरकारला निवडणुकीत धुळीस मिळवा असे आवाहन करतानाच काँग्रेसचे सरकार आल्यास अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याची घोषणा अ. भा. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली.

खानापुरात काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या जाहीर प्रचार सभेला संबोधित करताना एआयसीसी सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आजवर दुर्लक्षित राहिलेल्या आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी विषेश घोषणा केली. कोविड काळात आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना आरोग्यसेवा दिली. पण त्यांना एरव्हीच्या काळात अत्यल्प मानधन मिळते, निवृत्तीनंतर कसलेच लाभ मिळत नाहीत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आल्यास अंगणवाडी शिक्षिकांना दरमहा 15 तर मिनी अंगणवाडी शिक्षिकांना 10 हजार रुपये मानधन देण्यात येईल. आशा कार्यकर्त्यांना दरमहा 8 हजार तर माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये मानधन देण्यात येईल. अंगणवाडी कार्यकर्त्यांना निवृत्तीनंतर तसेच दुर्दैवाने मृत्यू झाल्यास एकरकमी 3 लाख तर आशा कार्यकर्त्या आणि माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल तसेच युवनिधी योजना राबवून सत्तेत येताच सर्वप्रथम विविध सरकारी खात्यांमधील अडीज लाख रिक्त पदे भरण्यात येतील अशी घोषणा प्रियांका गांधी यांनी केली.

यावेळी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर प्रियांका गांधी यांनी टीकेचे आसूड ओढले. त्या म्हणाल्या की, भाजप सरकारने कर्नाटकाची तब्बल दीड लाख कोटी रुपयांची लूटमार केली आहे. इतक्या रकमेत गोरगरिबांसाठी अनेक विकासकामे करता आली असती. एससी, एसटी, मागासांसाठी आरक्षण वाढविल्याचा गाजावाजा भाजप कर्नाटकात करत असला तरी केंद्रातील त्यांच्याच मोदी सरकारने 14 मार्च रोजी हे आरक्षण घटनेच्या निकषात बसत नाही, त्यामुळे ते देता येत नाही असे संसदेत सांगितले आहे. यावरून भाजप जनतेची दिशाभूल, फसवणूक करतोय हे स्पष्ट होते असा आरोप त्यांनी केला. भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता उपभोगली. नोकरीसाठी लाच देण्यास पैसे नसल्याने एका शेतकऱ्याच्या मुलाकडे त्याचे दोन बैल मागण्यात आले. या सरकारला जनता 40% कमिशनचे भ्रष्ट सरकार म्हणूनच ओळखू लागली आहे. कंत्राटदार या भ्रष्टाचारामुळे आत्महत्या करत आहेत. कंत्राटदार संघटनेने पंतप्रधानांना पत्र लिहूनदेखील मोदींकडून त्याला उत्तर दिले जात नाही. भाजप सरकारने महागाई वाढवून महिलांवर अन्याय केला आहे. नौजवानांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. खत, उपकरणे ट्रॅक्टर अशा सर्वच गोष्टींवर जीएसटी लावून देशातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने नेहमीच जनतेच्या कल्याणाला प्राधान्य दिले असून दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला आणि खानापुरात डॉ. अंजली निंबाळकर यांना पुन्हा निवडून आणा असे आवाहन प्रियांका गांधी यांनी केले.
यावेळी बोलताना आ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, खानापूर मतदार संघात गेल्या पाच वर्षांत अनेक विकासकामे केली. पण भाजप सरकारकडून ती होऊ नयेत यासाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आमटे येथे मुलींच्या वसतीशाळेच्या, 25 वर्षे रखडलेल्या बसस्टॅण्डच्या उदघाटनात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी खोडा घातला. तरीही अनेक कल्याणकारी कामे केल्याचे सांगून विकासासाठी पुन्हा यावेळेस संधी देण्याचे आवाहन केले.
यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनीही विचार मांडले. व्यासपीठावर एआयसीसी सरचिटणीस व कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला, एआयसीसी सरचिटणीस विश्वनाथ, काझी नवाजुद्दीन, नीरज डांगी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते. पुंडलिक कुंभार या दिव्यांग कलाकाराने बनवलेली गौतम बुद्धांची मूर्ती देऊन, शाल घालून आ. अंजली निंबाळकर यांनी प्रियांका गांधी यांचा सत्कार करून स्वागत केले.
सभेला खानापूर तालुका, कित्तूर, बेळगाव, हुबळी-धारवाड आदी ठिकाणचे काँग्रेस कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments